हदगाव शहरात बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:43+5:302021-09-02T04:39:43+5:30
हदगाव शहरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची निनावी तक्रार मंगळवारी सकाळी प्राप्त झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले ...
हदगाव शहरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची निनावी तक्रार मंगळवारी सकाळी प्राप्त झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली. या बालविवाहाबाबत निनावी तक्रार करण्यात आल्याची कुणकुण बालविवाह करणाऱ्या परिवारासही लागली. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासकीय पथक हदगावमधील त्या घरी पोहोचले. मात्र तेथे एका सज्ञान युवतीच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दर्शविले. इतकेच नव्हे, तर त्या मुलीचे जन्म प्रमाणपत्रही पथकाला दाखविले. त्यावर युवतीचे वय १९ वर्षे होते. त्यामुळे हे पथक माघारी फिरले. मात्र तक्रारकर्त्याने, त्या कुटुंबीयांनी प्रशासकीय पथकाची दिशाभूल केल्याचे सांगत ‘त्या’ युवतीचा नव्हे, तर तिच्या लहान बहिणीचा विवाह केला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पथकाने पुन्हा एकदा कारवाईसाठी तयारी केली. मात्र यादरम्यान नियोजित वर आणि बालवधू केदारगुडा या धार्मिक स्थळाकडे रवाना झाले होते. विशेष म्हणजे वधू आणि वर हे वेगवेगळ्या वाहनाने निघाले. या सर्व बाबी पाहता, तहसीलदार जीवराज डापकर यांनी महसूल, बालविकास प्रकल्प अधिकारी, बालसंरक्षण अधिकारी आदींच्या मदतीने तीन पथके स्थापन करीत वेगवेगळ्या मार्गावर रवाना केली. अखेर हदगावजवळ पोलीस विभागाच्या मदतीने होणाऱ्या नवरदेवास सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. यावेळी बालवधू मात्र त्या वाहनात नव्हती. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले. बालविवाह होणार असल्याची खात्री करून अल्पवयीन मुलीचे आई-वडील तसेच नवरदेवाकडील मंडळींचे रितसर जबाब नोंदविण्यात आले. बालविवाह घडून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुलींची काळजी व संरक्षण तसेच भविष्यातील पुनर्वसनाच्यादृष्टीने मुलीस बालकल्याण समिती येथे हजर राहण्याबाबत कळवण्यात आले आहे.
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. बालविवाह प्रतिबंधासाठी तसेच बालविवाह रोखण्यासाठी जबाबदार घटकांचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. तरीही छुप्या पद्धतीने बालविवाह सुरूच असल्याची बाब पुढे आली आहे.
हदगाव येथील बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार डापकर यांच्यासह गटविकास अधिकारी केशव गड्डाफोड, जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. रशिद शेख, पोलीस निरीक्षक हनमंत गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम, गोविंद खैरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्द्या आळणे, संरक्षण अधिकारी सोनारकर, तसेच स्थानिक पोलीस व स्थानिक महसूल प्रशासनाने परिश्रम घेतले.