अनाथ मुलांच्या भोवती गुंफवण्यात आलेली कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:04 AM2018-12-02T01:04:08+5:302018-12-02T01:04:53+5:30

एखादा व्यक्ती अनाथ असल्यास, त्याला त्याचे नाव, आडनाव, जात माहिती नसेल तर काय होऊ शकते हे ‘कोणी जात देता का? जात...’ या नाटकातून पहावयास मिळते.

A story that is twisted around orphans | अनाथ मुलांच्या भोवती गुंफवण्यात आलेली कथा

अनाथ मुलांच्या भोवती गुंफवण्यात आलेली कथा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा रसिक प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे नाटक

नांदेड : मानवी आयुष्यात आडनावाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. कारण आडनावावरून त्या व्यक्तीची जात स्पष्ट होत असते. परंतु, एखादा व्यक्ती अनाथ असल्यास, त्याला त्याचे नाव, आडनाव, जात माहिती नसेल तर काय होऊ शकते हे ‘कोणी जात देता का? जात...’ या नाटकातून पहावयास मिळते.
शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत किरण टाकळे लिखित, दिग्दर्शित ‘कोणी जात देता का? जात...’ या नाट्य प्रयोगाचे उत्तम सादरीकरण झाले. दोन अनाथ मुलांच्या भोवती गुंफवण्यात आलेली ही कथा रसिक प्रेक्षकांना वेगळ्या भावविश्वात घेऊन जाण्यास यशस्वी ठरते. स्वत:चे नाव, गाव, आडनाव माहिती नसलेले दोन अनाथ युवक माधव (सुदाम केंद्रे ) आणि श्याम (नृसिंह मुपडे) हे आपले पोट भरण्यासाठी कामाच्या शोधात जातात पण त्यांचे नाव, आडनाव माहिती नसल्यामुळे त्यांना कोणी काम देत नाही म्हणून, ते कधी मंदिरात शिकून तर कधी मशिदीत जादूचे खेळ करून जगू लागतात. त्यामुळे त्यांना हिंदू लोक हिंदू समजतात आणि मुस्लिम लोक मुस्लिम. एके दिवशी अचानक हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगा उसळतो आणि यात त्यांचा मृत्यू होतो. आता यांचे शव हिंदुंनी ताब्यात घ्यायचे की मुस्लिमांनी यासंदर्भात संभ्रम निर्माण होतो आणि त्यांची जात शोधण्याच्या प्रयत्नात हे नाटक घडते.
यातील सुदाम केंद्रे आणि नृसिंह मुपडे यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली, तर हिमालय रघुवंशी यांनी साकारलेली पत्रकार आणि हिंदू नेत्याची भूमिका उत्तम साकारली. यातील पोलीस इन्स्पेक्टर- वीरभद्र स्वामी, रामराव- अक्षय राठोड, मुस्लिम नेता आणि म्हातारा- शेख खय्युम, हवालदार- स्वप्निल साठेवाड, शेटजी आणि नइम- लक्ष्मीकांत देशमुख, यांनी आपापल्या भूमिकेस योग्य न्याय दिला तर भाग्यश्री खांडरे, स्नेहा पाटील, संस्कृती पाटील आणि आमीन शेख यांनी आपापली भूमिका साकारली.
या नाटकाची प्रकाशयोजना कुणाल गजभारे आणि अमोल जैन यांनी तर सूचक आणि आशयपूर्ण नेपथ्य अक्षय राठोड यांनी साकारले, किरण टाकळे यांनी साकारलेले संगीत, शेख खय्युम यांची रंगभूषा, रवी जाधव यांनी साकारलेली वेशभूषा हे सर्वच आशयपूर्ण होते. कपिल गुडसूरकर आणि राम चव्हाण यांनी रंगमंचव्यवस्था सांभाळली. २ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तन्मय ग्रूपच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित ‘भिंती पलीकडले’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: A story that is twisted around orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.