'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम
By श्रीनिवास भोसले | Published: December 10, 2024 01:21 PM2024-12-10T13:21:04+5:302024-12-10T13:22:22+5:30
परीक्षा विभाग म्हणते, परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही
नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षार्थ्यांना अद्याप प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थीपरीक्षा कशी देणार? असा सवाल उपस्थित केला जात असताना परीक्षा विभागाने मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र दिले जातील, असा अजब फंडा अवलंबिला आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा क्रमांक आदींची जुळवाजुळव करताना कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास जबाबदार कोण? असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेडसह हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यात आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग मात्र नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मंगळवारी (दि.१०)पासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. यामध्ये एम. ए., बी. ए., बी. काॅम., बी.एसस्सी., एम. कॉम., एम.एसस्सी आदींच्या परीक्षा तसेच बहिस्थ: विभाग आणि बॅकलॉग आणि रेग्युलर विषयाच्या परीक्षांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हॉल तिकीटच पोहोचले नाही. त्यामुळे ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्र पाहून परीक्षेस बसू द्यावेत, अशा सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रप्रमुखांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्या आहेत. मात्र, ऐनवेळी विना हॉल तिकीट परीक्षा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर का ओढावली, परीक्षा विभागाच्या या सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
परीक्षार्थ्यांची मानसिकतेचे काय?
विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, पण परीक्षेसाठी असणारा आसन क्रमांक नाही, कोणत्या विषयाचा पेपर ते माहीत नाही. ऐनवेळी परीक्षा केंद्र हॉल अन् आसन क्रमांक दिला जाणार, अशा संभ्रमावस्थेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता राहणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
परीक्षा विभागा गोंधळला
परीक्षा विभाग आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेचे आयोजन केले जाते. प्राचार्यांच्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट केले जाते. परंतु, परीक्षा विभागाने सदर आवेदनपत्र तथा हॉल तिकीट प्राचार्यांच्या लॉगीनमध्ये अपलोड केले गेले नाहीत. त्यामुळे गोंधळलेल्या परीक्षा विभागाने ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्रावर परीक्षा घेण्याच्या लेखी सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रचालकांना दिल्या आहेत.
काय म्हणतात परीक्षा विभागाचे संचालक...
विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा आवेदनपत्र सादर करूनही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे परीक्षा विभागाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. ओळखपत्र पाहून विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचे अधिकार परीक्षा विभागाने परीक्षा केंद्रांना दिलेले आहेत.
- हुशारसिंग साबळे, संचालक - परीक्षा व मूल्यमापन विभाग, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.