‘हनम्याच्या मरिआय’ने केला मनोरंजनातून अंधश्रद्धेवर प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:11 AM2018-11-24T01:11:49+5:302018-11-24T01:13:36+5:30
परळी वै़येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीने सादर केलेल्या ‘हनम्याची मरिआय’ या नाटकाने अंधश्रद्धेवर प्रहार केला़ याबरोबरच सकस अभिनयाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन करतानाच अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देण्याबाबत प्रबोधनही केले़
नांदेड : परळी वै़येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीने सादर केलेल्या ‘हनम्याची मरिआय’ या नाटकाने अंधश्रद्धेवर प्रहार केला़ याबरोबरच सकस अभिनयाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन करतानाच अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देण्याबाबत प्रबोधनही केले़
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी येथील कुसुम सभागृहात सुरु आहे़ परळीच्या सर्वोदय शिक्षण कला अकादमीने हे नाटक सादर केले़ विजय खानविलकर यांनी लिहिलेले हे नाटक अरुण सरवदे यांनी दिग्दर्शित केले़ नाटकाचा नायक पोतराज असलेला हनम्या (अरुण सरवदे) आणि त्याची पत्नी गौरी (सुवर्णा बुरांडे) यांच्याभोवती गुंफलेली ही कथा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली़ परंपरागत चालत आलेल्या अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देवून प्रबोधन करतानाच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही हे नाटक कमालीचे यशस्वी ठरले़
हनम्या आणि गौरीला बऱ्याच नवसानंतर मुलगा होतो़ या मुलाला चांगले शिक्षण देवून मोठा अधिकारी बनवायचे या दोघांचे स्वप्न असते़ परंतु, मरिआईची भीती दाखवून महाराज (संतोष कणसे) मुलाला पोतराज बनवायला सांगतो़ मरिआयचा जागर घालण्याची सूचनाही तो या दोघांना देतो़ भीतीपोटी हनम्या हे सारे करण्याचे मान्य करतो़ आणि त्यासाठी पैसा जमवू लागतो़ पै-पै जमविलेले पैसे चोरी जातात़ मात्र जागर तर घालायचा असतो़ मग हनम्या नसबंदीची शस्त्रक्रिया करुन पैसे जमवितो़ आणि जागर घालतो़ यातच त्याच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू होतो़ या घटनेनंतर मात्र हनम्या आणि गौरीचा मरिआईवरुन विश्वास उडतो़ आणि अखेर ते दोघेही ही सर्व अंधश्रद्धा नाकारतात, पोतराजकी सोडतात़ प्रेक्षकांना सकारात्मक विचार करायला हे नाटक भाग पाडते़
नाटकात सत्यम सरोदे यांनी बाब्याचे पात्र अतिशय सुरेखपणे साकारले आहे़ तर रेणुका शहाणे, आनंद कांबळे, परमेश्वर देवकते, सुधीर माले, पंकज गोरे, प्रदीप चोपणे, गणेश उदारे, गजानन चिंचोळे, तिलोत्तमा पतकराव, पंचफुला शितोळे यांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत़ पूजा राठोड, आकांक्षा नवले, नंदीनी दहीभाते, आर्यन धपाटे, सुलभी बुरांडे, अदिती धपाटे या बालकलावंतांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या़ नैपथ्य सुरेश बुरांडे, प्रकाशयोजना गिरीष बिडवे, संगीत प्रकाश बोरगावकर, रंगभूषा गणराज सरवदे तर वेशभूषेची जबाबदारी सुनीता कणसे यांनी पार पाडली़
आज ‘गावगुंडांचा विषारी विळखा’
हौशी राज्य नाट्यस्पर्धेत शनिवारी बोरी (उस्मानाबाद) येथील निपॉन सोशल वेलफेर सोसायटीच्या वतीने पूजा राठोड लिखित आणि अभय राठोड दिग्दर्शित ‘गावगुंडांचा विषारी विळखा’ हे नाटक सादर होणार असल्याचे स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी सांगितले़