पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:08+5:302021-01-21T04:17:08+5:30
नांदेड, उडाण सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राजमुद्रा धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते भारत काकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत ...
नांदेड, उडाण सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राजमुद्रा धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते भारत काकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नंदनवन नेरली कुष्ठधाम येथे कुष्ठरूग्णांना फळांचे वाटप केले. यावेळी कुष्ठधामच्या व्यवस्थापिका गायकवाड, धीरज जामगे पाटील, वन अधिकारी विजयकुमार दासरवाड तसेच रविंद्र काळे, दत्ता काकडे, माधव देवडे, ईश्वर काकडे, भागवत बारसे, नागेश काकडे आदींची उपस्थिती होती.
रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान
नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान, आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून सायकल रॅलीने प्रारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व सायकल रॅलीत सहभागी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत आदींची उपस्थिती होती.
मुख्य रस्त्यावर खड्डे
नांदेड, स्नेहनगर वसाहत कमानीसमोर मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. श्रीनगर ते शिवाजीनगर हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर पोलीस वसाहतीच्या समोर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत. तसेच खड्डा चुकविण्यासाठी अचानक वाहने वळविली जात असल्याने इतर वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
अंधारामुळे गैरप्रकार
नांदेड, शासकीय विश्रामगृह ते महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर या रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत काही टवाळखोर गैरप्रकार करत आहेत. तसेच पायी जाणार्या विद्याथ्यार्ंच्या खिशातील पैसे, मोबाईल काढून घेण्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच मुलीची छेडछाड होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील सर्वच पथदिवे दुरूस्त करून सुरू करण्याची मागणी होत आहे.
महारक्तदान शिबीर संपन्न
नांदेड़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आयोजित राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. तर उद्घाटक म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रमुख पाहुणे म्हणून आ. राम पाटील रातोळीकर, समाजसेविका आशाताई श्यामसुंदर शिंदे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. रेणुकाताई मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, गंगाधरराव जोशी, वच्छलाताई पुयड, गजानन माने, गणेश पाटील काळम, जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे आदींची उपस्थिती होती.
झाडझुडपे तोडण्याची मागणी
नांदेड, नांदेड ते मालेगाव या रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील वळण रस्त्यावर काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहेत. कासारखेड्यापासून पुढे असलेल्या वळण रस्ता, भालकी येथील वळण रस्ता, देगाव येथील वळण रस्ता आदी ठिकाणची झाडेझुडपे तोडण्याची मागणी होत आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
देवडे कुटुंबियांचे सांत्वन
नांदेड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव देवडे लहानकर यांच्या मातोश्री अनुसयाबाई गंगाराम देवडे यांचे निधन झाले. देवडे कुटुंबियांची माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, संतोष मुळे, सखाराम तुप्पेकर, धम्मा कदम, शहर उपाध्यक्ष संतोष कानघुले, नवी मुंबई एपीआय विशाल देवडे, शिवाजी पांगरीकर, बालाजी धुमलवाड, गंगाधर देवडे, सुभाष देवडे, वैजनाथ माने, संतोष पंदिलवड, किरण पडलवाड आदींची उपस्थिती होती.
रक्तदान शिबीराचे आयोजन
नांदेड, जिल्हा कोचिंग क्लासेस पीटीए संघटनेच्यावतीने २६ जानेवारी रोजी रक्तदान शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे. सध्या रक्ताचा असलेला तुटवडा दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदान करावे, असे आवाहन पीटीएच्यावतीने करण्यात आले आहे.
मंगल कार्यालय दुरूस्तीची मागणी
नांदेड, नवीन मोंढा परिसरात शेतकर्यांच्या मुलींचे लग्न मंगल कार्यालयात व्हावे या उद्देशाने बाजार समितीच्या बाजूला उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयाची इमारत मोडकळीस आली आहे. सदर इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने मंगल कार्यालय उभारावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे गिरधारी पाटील जोगदंड, परमेश्वर पाटील, कमलेश कदम आदींनी केली आहे.