जप्त वाळूसाठी ठेकेदारांची जोरदार फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:21 AM2018-10-11T01:21:10+5:302018-10-11T01:21:31+5:30

Strong fielding of contractors for seized sand | जप्त वाळूसाठी ठेकेदारांची जोरदार फिल्डिंग

जप्त वाळूसाठी ठेकेदारांची जोरदार फिल्डिंग

Next
ठळक मुद्देउमरीत पाच हजारपेक्षाही अधिक ब्रास वाळूसाठा : शासकीय दर १२७६ वरुन २२०० रुपये प्रतिब्रास

बी.व्ही. चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या ठेकेदारांमध्ये तहसील कार्यालयात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.
यावेळी अधिकाऱ्यांनी या सर्व ठेकेदारांना बाहेर बसवून शांत केले. नांदेड जिल्ह्यात केवळ उमरी तालुक्यात सहा वाळूघाट असून शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात गोदावरी नदीतून वाळूचा उपसा करण्यात आला. गोदावरी नदीच्या परिसरात महाटी, येंडाळा, कौडगाव, शिंगणापूर, बिजेगाव, कावलगुडा, हस्सा आदी गावांच्या शिवारात या वाळूचे साठे करण्यात आले. उमरी तहसीलतर्फे या अवैधरित्या जमा केलेल्या वाळू साठ्यांची जप्ती करण्यात आली. सध्या उमरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या परिसरात सुमारे पाच हजार ब्रासपेक्षाही अधिक अवैधरित्या वाळूचे साठे आहेत. असे असले तरी सदरील वाळू साठा कमी प्रमाणात असल्याचे भासवून कमी पैशामध्ये या वाळूची बोली लावण्याचा घाट अनेकांनी रचला आहे. असे असले तरी प्रशासन याबाबत काय भूमिका घेते यावर बरेच अवलंबून आहे. यापूर्वीचा वाळूचा शासकीय दर १२७६ रुपये प्रतिब्रास याप्रमाणे होता. आता त्यात वाढ होऊन प्रतिब्रास २२०० रुपये एवढा झालेला आहे. येत्या आर्थिक वर्षात वाळू घाटांच्या लिलावा संदर्भात प्रक्रिया सुरू होत आहे. उमरी तालुक्यातील सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण झाले असून भूवैज्ञानिक खात्याच्यावतीने सर्वेक्षण झाले आहे. त्यांच्या अहवालानुसार आगामी लिलावासाठीचे वाळूघाट निश्चित केले जातील. त्यानुसार सर्व नियम व अटी यांचे पालन करून वाळू घाटांचा लिलाव होईल.

अवैध वाळूचे चार टिप्पर पकडले
उमरी : येथील महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली असून बळेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे जमा केलेली वाळू अवैधरित्या वाहतूक करताना चार टिप्पर पकडण्यात आले. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेश लांडगे, जी. एस. कोतलगावकर, मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, एस.बी. बाचीपल्ले, तलाठी सोन्नर, हराळ, जाधव तसेच कोतवाल दिलीप यमेवार, राठोड आदींनी ही कारवाई केली. बळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १० आॅक्टोबर रोजी बुधवारी पहाटे पाच वाजेपासून बळेगाव येथील गोदावरी नदीपात्राशेजारी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पाळत ठेवली होती. यावेळी अचानक धाडी टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले. महसूल विभागाने पकडलेल्या टिपरचे क्रमांक एमएच-२६-बीई , एमएच-२६ एडी- ३०५५ , एमएच-२० वाय-८३४१, एमएच-१६-जी-६५७९ याप्रमाणे आहेत.
सदर वाहनांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली.

Web Title: Strong fielding of contractors for seized sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.