शाळेच्या नवीन वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 01:41 PM2023-09-01T13:41:03+5:302023-09-01T13:47:49+5:30
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून दीड वर्षांपूर्वीच्या वर्गखोली बांधकामाचा दर्जा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
- सुनील चौरे
हदगाव : रावणगाव (ता. हदगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे दीड वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीच्या स्लॅबचा गिलाव्याचा मोठा भाग अंगावर पडल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) घडली आहे.
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून दीड वर्षांपूर्वीच्या वर्गखोली बांधकामाचा दर्जा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. दुसरी वर्गातील वैभव जाधव याच्या अंगावर गिलाव्याचा भाग अचानक पडल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुळे वर्गातील इतर विद्यार्थी घाबरून रडू लागले. शिक्षकांनी वर्गात येऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढत वैभवच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार कळविला. त्याला तामसा येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे.
या प्रकारामुळे येथील वर्गखोली बांधकामाबद्दल पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सदरील वर्गखोलीचा स्लॅब गिलावा गळून फुगल्याचे स्पष्ट झाले होते. त्याकडे दुर्लक्ष होण्याचा फटका मंगळवारच्या दुर्घटनेमुळे वैभवला दुर्दैवाने सहन करावा लागला. सदरील वर्गखोली बांधकामाशी संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे कथित दुर्लक्ष या घटनेस कारणीभूत मानले जात आहे. याप्रकरणी कारवाई होते की मौनी भूमिका घेऊन दोषींना अभयदान दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.