केदारगुडा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:38 AM2019-01-16T01:38:22+5:302019-01-16T01:38:34+5:30
केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.
हदगाव : केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.
केदारगुडा येथे आदिवासी मुली-मुलांची शासकीय आश्रमशाळा आहे. मुलीसाठी अधीक्षिका असूनही मुलीचे मासिक पाळीचे रिपोर्ट त्यांनी निरंक दाखविले. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यातही शाळेत उपस्थित असल्याचे हजेरीपटावरुन सिद्ध झाले. तो पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. दर महिन्याला मुलीची तपासणी करण्याचा अधिकार अधीक्षिकांना आहे. मुलासाठी स्वतंत्र पुरुष अधीक्षक असतो. मुलीचे जेवण त्यांना स्वतंत्र पुरविण्याची जबाबदारी अधीक्षिकांची असते. त्यांनी दिलेल्या अहवालावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असते. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यात शाळेत उपस्थित होती. त्या महिन्याच्या तपासणीत तिचा अहवाल निरंक दिला. हा गंभीर प्रकार आहे. याउलट हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक ए. जे. झुंजारे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पालकांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला व लग्नाचा उपायही सुचविला, असा आरोप आहे. आश्रमशाळेत मुलगी असताना शाळाबाह्य मुले शाळेत येतातच कसे, या प्रश्नाचे उत्तर मुख्याध्यापक देऊ शकत नाहीत. मुलगी शाळेत नियमित येत नसे व मासिक पाळीची तपासणी सहा महिन्याला एकदा होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगून अधीक्षिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी पीओ आले नव्हते तर इतर चौकशीसाठी आल्याचे ते म्हणाले. पण इतर कोणत्या प्रकरणात तपास सुरु आहे, याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले नाही. असा गंभीर प्रकार घडल्यानंतर मुलाला गंभीर शिक्षा असल्यामुुळे ते तत्काळ लग्न करुन स्वत:चा बचाव करुन घेतात. पुन्हा त्या मुलीला वाऱ्यावर सोडून देतात. असे प्रकार यापूर्वी याच शाळेत घडले आहेत. मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षक या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावर प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
४मुलीचे लग्न १८ आणि २१ वर्षे झाल्याशिवाय मुलाचा विवाह करता येत नाही. तसा कायदाही आहे. याचाही विसर मुख्याध्यापकांना पडल्याचा दिसतो. या गंभीर प्रकरणामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतात, याचाही विसर पडल्याचे दिसते. झालेला प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तामसा येथील आदिवासी बचाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.