मेंदूची व्यायामशाळा विद्यार्थ्यांना करतेय तल्लख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:47 PM2018-12-24T18:47:14+5:302018-12-24T18:52:33+5:30

मेंदूला दररोज व्यायाम देवून विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढविता येवू शकते.

Students became talented by Brain gymnasium | मेंदूची व्यायामशाळा विद्यार्थ्यांना करतेय तल्लख

मेंदूची व्यायामशाळा विद्यार्थ्यांना करतेय तल्लख

googlenewsNext
ठळक मुद्देबौद्धिक क्षमता वाढविणारे तंत्र   विद्यार्थी ११७ पर्यंत खाडखाड म्हणतात पाढे

- विशाल सोनटक्के

नांदेड : प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धी सारखीच असते. परंतु, मेंदूला दररोज व्यायाम देवून विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढविता येवू शकते. हेच काम नांदेड येथील बालासाहेब कच्छवे हे मागील पंधरा वर्षांपासून करीत आहेत. मेंदूतील न्युरॉनची योग्य जुळवणी करुन शिकवण्यातले विज्ञान विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने समजावल्यास प्रत्येक विद्यार्थी तल्लख बुद्धीचा होऊ शकतो. याचा प्रत्यय कच्छवे यांच्या मेंदूच्या व्यायामशाळेत येतो. त्यांचे अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी याच तंत्राद्वारे आज ११७ पर्यंतचे पाढे खाडखाड म्हणतात. 

जन्माअगोदर गर्भामध्ये सर्वप्रथम मेंदू तयार होतो. याच मेंदूला तुम्ही कसे विकसित करता यावर विद्यार्थ्याचा बुध्यांक अवलंबून असतो. यात अनुवंशिकता हा घटक असतो. याबरोबरच संगोपन यालाही महत्त्व आहे. तुम्ही कसे विचार करता त्यानुसारच तुमची विचार करण्याची वृत्ती आणि बुद्धी तयार होते. विद्यार्थ्याची आवड बघून त्यानुसार त्याला नियमित सराव दिल्यास असा विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतो. आपण मुलांना विविध प्रकारची खेळणी देतो. बुद्धिबळासारखा खेळही त्याच्या बौद्धिक क्षमतावाढीसाठी उपयोगी असतो. परंतु, बाहेर देशातील पालक आपल्या मुलांना कोणती खेळणी देतात आणि मुलांची बौद्धिक क्षमता ते कशा पद्धतीने विकसित करतात? असा प्रश्न कच्छवे यांना पडला. आणि येथेच मेंदूच्या या व्यायामशाळेचा जन्म झाला. 

जिल्हा परिषदेच्या मल्टीपर्पज हायस्कूलमधील जिल्हा समुपदेशक असलेल्या बालासाहेब कच्छवे यांनी याच प्रश्नातून बौद्धिक क्षमता विकसित करणारे विविध देशांतील विद्यार्थ्यांसाठीचे खेळ जमविण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठीची खेळणी आणि बौद्धिक क्षमता विकसित करणारी पुस्तके आणण्यासाठी ते दिल्ली येथे भरणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरला दरवर्षी नियमितपणे जाऊ लागले.  यातूनच ब्राझीलमधून रुबेक क्युब, चीन, जपानमध्ये वापरले जाणारे टनग्राम, अमेरिकेतील मिकाडो स्टिकस्, कोरियातील आयक्यू बुस्टर्स  यासह विविध खेळणी त्यांनी उपलब्ध करुन घेतली. याबरोबरच बॅड हॅबीट, गुड हॅबीट दर्शविणारी सापशिडी त्यांनी स्वत: विकसित केली. विशेष म्हणजे, या खेळण्याच्या पेटंटसाठी त्यांनी अर्जही केला आहे. 

विद्यार्थ्यांचा मेंदू हा पितळेसारखा असतो. तुम्ही घासाल तेवढा तो सोन्यासारखा चमकतो. हे लक्षात घेवून नांदेड तालुक्यातील पुयणी, एकदरा आणि बोंढार या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवड्याला एक तास देवून वरील खेळण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मेंदूला सुनियोजित पद्धतीने सराव देण्याचे काम कच्छवे यांनी सुरू केले. याद्वारे विद्यार्थ्यांचे विचार स्थिर करीत त्यांच्यात एकाग्रतेची क्षमता विकसित करण्यात आली. आणि बघता बघता त्यांच्या या मेंदूच्या व्यायामशाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थीही अगदी १ ते ११७ पर्यंतचे पाढे खाडखाड सांगू लागले आहेत.
 

... अन् भापकर यांनी विद्यार्थ्यांना दिले हजाराचे बक्षीस
 

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर हे पूर्वी शिक्षण आयुक्त या पदावर कार्यरत होते. २०१३-१४ मध्ये ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बालासाहेब कच्छवे यांच्या पुयणी येथील या मेंदूच्या व्यायामशाळेला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी कच्छवे यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्याच्या मॉडेलची पाहणी केली.  यावेळी जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी भापकर यांच्यासमोर १ ते १०० पर्यंतचे पाढे खाडखाड बोलून दाखविले. हे पाहून भापकर यांनी पाढे सांगणाऱ्या तीन ते चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजाराचे बक्षीस देवून कच्छवे यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले होते. 

विद्यार्थ्यांना ‘बिझी टू क्रेझी’ करण्याची आवश्यकता

मागील २० वर्षांपासून बुद्धिमापन व करिअर कौन्सलिंग करीत आहे. हे करताना अनेक आयएएस अधिकाऱ्यांचाही आयक्यू तपासला. त्यावेळी बौद्धिक क्षमता उच्च दर्जाची आढळली; पण त्याचबरोबर उच्च दर्जाचे नियोजन आणि हातात घेतलेले काम पूर्ण एकाग्रतेने करण्याची पद्धत प्रकर्षाने दिसून आली. तोच पॅटर्न मी विद्यार्थ्यांमध्ये राबवित आहे. याच माध्यमातून मी माझ्या मुलाला घडविले असून तो सध्या आयआयटी खरगपूर (पश्चिम बंगाल) येथे उच्च शिक्षण घेत आहे. साधारण ७० टक्के मुले आळशी असतात. म्हणून, अभ्यासात मागे राहतात. अशा मुलांना पालक अभ्यासात बिझी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हाती काही मिळत नाही. कारण विद्यार्थ्यांना ‘बिझी टू क्रेझी’ करण्याची आवश्यकता आहे. हेच काम मी मेंदूच्या व्यायामशाळेद्वारे करीत आहे. 
- बालासाहेब कच्छवे

Web Title: Students became talented by Brain gymnasium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.