परभणीतील विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती तर हिंगोलीतील विद्यार्थी अद्यापही घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:05+5:302021-01-08T04:54:05+5:30
नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते ...
नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा वगळला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसू लागली आहे. ४ जानेवारी रोजीच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ टक्के विद्यार्थीच शाळेमध्ये आले होते.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु केल्या आहेत. राज्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण २२ हजार २०४ शाळा असून यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५६ लाख ४८ हजार २८ इतकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी यातील ९ हजार १२७ शाळा सुरु होऊन २९ लाख ९१हजार ८३ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर हळूहळू इतर शाळाही सुरु होवू लागल्या. ४ जानेवारीपर्यंत ९ वी ते १२ वी या वर्गाच्या राज्यातील १९ हजार ५२४ शाळा सुरु झाल्या असून १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत.
मराठवाड्यातील शाळांचा विचार करता मराठवाड्यातील इयत्ता ९ वी ते १२वीच्या ४ हजार ७८६ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ४६५, लातूर जिल्ह्यातील ४९१, जालना जिल्ह्यातील ५१९, औरंगाबाद जिल्हयातील ११२०, बीड जिल्ह्यातील ७६०, नांदेड जिल्ह्यातील ८५४, परभणी जिल्ह्यातील ५३७ तर हिंगोली जिल्ह्यातील १४६ शाळांचा यामध्ये समावेश असून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हेच प्रमाण ३५.४ टक्के, लातूर ५२ टक्के, जालना ५३.१ टक्के, बीड १८ टक्के, नांदेड ३०.३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४ जानेवारी रोजी १२.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.
चौकट........
सर्वाधिक शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु
इयत्ता ९ वी ते १२वीच्या शाळांना सध्या प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ९९.५ टक्के शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. या शाळामध्ये ४ जानेवारी रोजी ५७ हजार ४१२ विद्यार्थी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात ९४.७ टक्के, लातूर ८७.१ टक्के, जालना ९८.७ टक्के, औरंगाबाद ९६.७ टक्के, बीड ९९ टक्के, परभणी ८९.८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ टक्के शाळा ४ जानेवारीपर्यंत सुरु झालेल्या आहेत.