विद्यार्थ्यांचे आंदोलन धोरणविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:57 PM2019-04-04T23:57:41+5:302019-04-04T23:59:39+5:30
पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़
नांदेड : पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़ हे आंदोलन धोरणाविरोधी असल्याची प्रतिक्रिया पशुचिकीत्सा व्यवसायी संघटेनेन दिली आहे़
विभागामार्फत करण्यात आलेल्या पदोन्नत्या नियमानुसार झालेल्या असून विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबविण्यासाठी प्रधान सचिव अनूप कुमार यांनी पत्राद्वारे कुलगुुरुंना कळविले आहे़
पशूधन पर्यवेक्षक, सहायक पशूधन विकास अधिकारी व पशूधन विकास अधिकारी गट ब संवर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेकडून खुलासा सादर करण्यात आला आहे़ पदोन्नतीने भरण्यात आलेली पदे पूर्णपणे पदवीधारक सहाय्यक पशूधन विकास अधिकारी संवर्गातून भरावयाची आहेत़
या पदावर पदवीधारक विद्यार्थी कधीही नियुक्त होणार नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात मिळणारी पदे शासनाने पदोन्नतीने भरली ही फूस विद्यार्थ्यांना लावण्यात आली आहे़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे़ हे आंदोलन आचारसंहितेच्या काळातच करण्यात येत असून हे धोरणाविरुद्ध आहे़ असेही संघटनेचे म्हणणे आहे़ अशाप्रकारचे चुकीचे आंदोलन करुन संवर्गाची बदनामी करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही संघटनेने केली आहे़ निवेदनावर अध्यक्ष डॉ़सुनिल काटकर, डॉ़पवन भागवत, डॉ़एऩपीक़ानोले यांच्या स्वाक्ष-या आहेत़