विद्यार्थ्यांनी केला पाहुण्यांकडेच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:30 AM2018-07-16T00:30:04+5:302018-07-16T00:30:19+5:30
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़
पळशी येथील विवेकानंद विद्यालयात सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम असल्यामुळे हदगावच्या सीमेवरील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतला आहे़ दररोज हदगाव तालुक्यातील जवळपास ९० विद्यार्थी पैनगंगेचे पात्र ओलांडून पळशी येथील शाळेत जातात़
सध्या पाऊस सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून शाळेत येवू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षकांनी केले आहे़ त्यामुळे जोपर्यंत नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत नाही़ तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला सुटीच घ्यावी लागते़ तर काही विद्यार्थी त्यानंतरही जीव धोक्यात घालून शाळेत येतात़ शनिवारी माटाळगा येथील तीन विद्यार्थी नदीपात्रातील कंबरेपर्यंतच्या पाण्यातून शाळेत आले़ परंतु सायंकाळी नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची पंचाईत झाली़ त्यानंतर शिक्षकांनी त्या मुलांचे नातेवाईक असलेल्या कुपटी, पळशी येथे नेवून सोडले़ या विद्यार्थ्यांना रात्रभर नातेवाईकांकडेच मुक्काम करावा लागला़
नातेवाईकांकडे सोडण्याची जबाबदारीही शाळेतील शिक्षकांवरच येवून पडते़ पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पाणी कमी होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़
मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
मुख्याध्यापक राजकुमार पेंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर या प्रकाराबाबत माहिती पाठविली होती़ तसेच त्यांना ई-मेलसुद्धा केला आहे़ पिंपरी येथील ओढा ओलांडता येत नसल्यामुळे या ठिकाणी फक्त ३० फुटांचा रस्ता करुन दिल्यास अनेक विद्यार्थ्यांची सोय होणार आहे़ त्याचबरोबर माटाळगा आणि मनुला येथील विद्यार्थ्यांसाठी ५०० मीटरचा रस्ता केल्यास ही समस्या दूर होणार आहे, असेही मुख्याध्यापक पेंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़