शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 08:37 PM2023-06-15T20:37:23+5:302023-06-15T20:37:57+5:30
शाळा उघडली पण शिक्षकच नाहीत; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सीईओंच्या दालनासमोर ठिय्या
- सचिन मोहिते
नांदेड :विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे भरावित यासह गणित, इंग्रजी विषयांना शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी मरखेल येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये जि.प. सीईओंच्या दालनासमोर ठिय्या मारला. चार तास उपाशीपोटी विद्यार्थी कार्यालयात बसले असताना प्रशासनाने साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड शहरापासून १०० कि.मी, अंतरावर असलेल्या देगलूर तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकांच्या मागणीचा प्रश्न मागील वर्षीपासून रखडला आहे. मागच्या वर्षभरात जि.प. प्रशासनाला सातवेळा पत्र पाठवून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील ४० विद्यार्थ्यांनी थेट नांदेड गाठले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. पाच तास विद्यार्थी उपाशीपोटी जि.प. सीईओंच्या कक्षासमोर बसले.
जि.प. सीईओ वर्षा ठाकूर या रजेवर होत्या, तसेच अतिरिक्त सीईओ हे व्ही.सी.मध्ये होते, शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षणाधिकारी किनवटमध्ये होत्या. इतर अधिकारी जि.प. कार्यालयात उपस्थित होते. मात्र एकाही अधिकाऱ्याने साधी विचारपूसही केली नाही. अखेर उपाशीपोटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास केळी आणि पाण्याच्या बॉटल आणून दिल्या. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी ५:३० पर्यंत हे आंदोलन सुरूच होते.
विद्यार्थ्यांना दिली केळी
उपाशीपोटी आलेल्या विद्यार्थ्यांची दखल जि.प. प्रशासनाने घेतली नाही. अखेर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनीच विद्यार्थ्यांना दुपारी केळी आणि पाणी उपलब्ध करून दिले.
इंग्रजी, गणितासह हवेत ८ शिक्षक
दहावीपर्यंत शाळा असलेल्या मरखेल जि.प. शाळेत ५६० विद्यार्थी संख्या असून, १२ शिक्षक आहेत. विद्यार्थी संख्येनुसार इंग्रजी, गणित, मराठी, हिंदी या विषयासह आणखी ८ शिक्षकांची आवश्यकता असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सांगितले.