अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:42 AM2018-07-05T00:42:48+5:302018-07-05T00:43:08+5:30
शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी बुधवारी दिले. क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई होत नसल्यास क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी बुधवारी दिले. क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई होत नसल्यास क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापौर शीला भवरे, आयुक्त लहुराज माळी, उपमहापौर विनय गिरडे, नगररचना विभागाचे सहायक संचालक संजय क्षिरे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यात झोन १ मध्ये ८२५, झोन २ व ३ मध्ये ३६९, झोन ४ मध्ये ६०७, झोन ५ मध्ये ६४८ आणि झोन ६ मध्ये ९९४ बांधकामे अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बैठकीत आयुक्त माळी यांनी क्षेत्रीय अधिकाºयांना धारेवर धरताना कावाई का होत नसल्याची विचारणा केली. केवळ ५३, ५४ ची नोटीस देवून थांबू नका, अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, प्रसंगी गुन्हे दाखल करा, असे आदेश त्यांनी दिले. अवैध बांधकामास जे आर्किटेक्ट जबाबदार असतील त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय कार्यालयातून कारवाई होत नसेल तर त्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.
तसेच बांधकाम परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम असल्यास त्यावरही कारवाई करावी. मनपा प्रशासनाने अनधिकृत बांधकामाची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश यावेळी महापौर शीला भवरे यांनी दिले.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय इमारत निरीक्षकांची नियुक्ती करावी. महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटाव पथक नियुक्त करावेत. अनधिकृत बांधकाम असेल तर ते रोखावे अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.
बैठकीस क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, सुधीर इंगोले, अविनाश अटकोरे, शिवाजी डहाळे, डॉ. मिर्झा बेग, पंडित जाधव यांच्यासह सर्व इमारती निरीक्षक उपस्थित होते.
---
बँकांनीही खबरदारी घ्यावी...
शहरातील बांधकामासाठी बँकांनी कर्ज देताना सदर बांधकाम मंजूर नकाशानुसार होत नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्जाचे वितरण करावे, अशी सूचना आयुक्त लहुराज माळी यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत कळविण्यात येणार आहे.
शहरात मालमत्ताकराच्या नोटिसा देताना अनधिकृत बांधकाम असणाºयांना शास्ती लावण्यात आली आहे. ही शास्ती लागलेले किती मालमत्ताधारक आहेत. तितकेच शहरात अनधिकृत बांधकामे असले तरी मनपाच्या यादीवर मात्र दुसरेच चित्र पुढे आले.