चक्क मध्यरात्री पुरात उतरले अधिकारी; अडकलेल्या दोघांना वाचवले, उपविभागीय अधिकाऱ्याचे धाडस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 02:23 PM2021-07-24T14:23:28+5:302021-07-24T14:32:21+5:30
Flood in Nanded : मध्यरात्रीच्या सुमारास अंधारलेल्या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी पुरात उतरून केली मदत
भोकर ( नांदेड ) : तालुक्यातील जामदरी येथे काळढोह नदीला आलेल्या पुरात दोन युवक अडकले होते. त्यांना सुखरूप काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरलेल्या उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना बऱ्याच प्रययत्ना अंती यश आल्याने खंदारे यांच्या धाडसाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील जामदरी येथील धम्मपाल संजय कसबे व अर्जून साईनाथ तमलवाड हे दोन तरुण शुक्रवारी ( दि. २३ ) सकाळी नेहमी प्रमाणे बैल चारण्यासाठी शेतावर गेले होते. बैल चारुन दुपारी ३ वाजता घराकडे परत येतांना गावाजवळील काळडोह नदीला अचानक पूर आला. तेंव्हा नदीच्या मधोमध अडकलेल्या तरुणांनी एका टेकडीचा आसरा घेतला. सोबतचे बैल पाण्यात पोहून बाहेर निघाले. परंतू, पोहता येत नसल्याने दोन्ही तरुण पूरात अडकले. प्रसंगावधान राखून धम्मपाल कसबे यांनी वडिलांना फोन करुन माहिती दिल्याने गावात खबर पोहचली. मदतीला गाव धावला पण पूराचे रौद्ररूप पाहून मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
प्रशासनाला याची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पो.नि. विकास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीच्या सुमारास अंधारलेल्या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी पाण्यात उतरण्याची तयारी केली. एका अधिकाऱ्याने केलेले धाडस पाहून आत्माराम अनपलवाड, प्रदिप पोटे, सचिन कसबे आणि भिमराव हातागळे हे सुध्दा पाण्यात उतरले. महत प्रयासानंतर दोरखंडाच्या सहाय्याने पूरात अडकलेल्या दोन्ही तरुणांना रात्री बारा वाजता सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडतात त्या करीता खबरदारी म्हणून भोकरला आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र कार्यालय व्हावे अशी मागणी सतीश देशमुख यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष असून आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. प्रशासनामार्फत नदी काठच्या गावातील तरुणांना तसे प्रशिक्षण देण्यात येते. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेण्यात येते.
- भरत सूर्यवंशी, तहसीलदार भोकर.