शिवनगर तांड्याची यशोगाथा साहित्याच्या पानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:03 AM2018-12-09T00:03:01+5:302018-12-09T00:03:39+5:30

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर (औरंगाबाद) यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘गुणवत्तेचे शिलेदार’ या साहित्याच्या पानावर आली.

Success Story of Shivanagar Struggle on the material page | शिवनगर तांड्याची यशोगाथा साहित्याच्या पानावर

शिवनगर तांड्याची यशोगाथा साहित्याच्या पानावर

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी शब्दबद्ध केली लोकसहभागाची गौरवगाथा

राजेश वाघमारे।
भोकर : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम भागातील शिवनगरतांडा वस्ती शैक्षणिक उपक्रमासोबत लोकसहभागातून लोकोपयोगी कार्याची महती सांगणारी यशोगाथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर (औरंगाबाद) यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘गुणवत्तेचे शिलेदार’ या साहित्याच्या पानावर आली.
जिल्ह्यात सर्वप्रथम आयएसओ नामांकनाचा मान प्राप्त केलेल्या भोकर तालुक्यातील शिवनगरतांडा येथील प्राथमिक शाळेने इतिहास रचला. संपूर्ण गौरबंजारा वस्ती असलेल्या शिवनगरतांडा येथील पूर्वपरिस्थिती लक्षात घेता गावाला स्वप्न पडल्याचा भास होतो. कारण, कधीकाळी वस्तीला रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांची वानवा होती. सभोवताली माळरान, कोरडवाहू शेती यामुळे वनसंपदेवर उपजीविका चालते. अज्ञान, व्यसन आणि अशिक्षिततेच्या काळोखात जीवनाचा गाडा ओढणारी परंपरा, ज्या वयात शिक्षणाची पायरी चढायची त्या वयातील बालकांच्या हाती गुरे, जनावरांची देखभाल, शेतातील कामांनी हातमिळवणी केली होती. स्वातंत्र्यानंतरही ६० वर्षांपर्यंत सुखसोयींपासून वंचित राहिलेल्या उजाड वस्तीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा दुर्लक्षित होती.
इयत्ता चौथीपर्यंतच्या दोनशिक्षकी शाळेत सन २००३ मध्ये शिक्षणकार्याचे ध्येय घेतलेले शिक्षक विठ्ठल आनंदसिंह चौहाण यांची शाळेवर नियुक्ती झाली. शाळा होती पण शाळेत विद्यार्थीच नव्हते. खचून न जाता, शाळेला भरभराटी आणण्याचे ध्येय उराशी बाळगून लोकसंपर्क वाढविला. ग्रामस्थांना विश्वासात घेवून बालकांची पावले शाळेकडे वळवली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. एवढ्यावरच समाधान न मानता शिक्षणात नवनवे प्रयोग, उपक्रम हाती घेतले. त्यास जोड मिळाली ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या सहभागाची. माती बंधारे, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, वनराई बंधारे, तांडा विकास कार्यशाळा यासारख्या उपक्रमांनी शाळा चर्चेत आली. वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर पहिली एसटी सुरु झाली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. गुणवत्तावाढीसाठी विद्यार्थी दत्तक योजना, वाचन-लेखन, माझी ई-शाळा असा नवा उपक्रम सुरु करण्यात आला. शिक्षक चौहाण यांनी १ लक्ष १० हजार रुपयांची पदरमोड कामी लावली. अशा या तांडा वस्तीच्या शाळेची यशोगाथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या ‘गुणवत्तेचे शिलेदार’ यात स्वतंत्र स्थान दिले.
श्रमदानातून झाली जलसंधारणाची कामे
‘लोकमत’ने गाव दत्तक घेतले, यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लोकजागृती करण्यात आली. वस्तीच्या आत्मनिर्भरतेसाठी नवे उपक्रम, शासकीय योजना मदतीला धावून आले. उत्तम शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. अधिकारी, ग्रामस्थांनी मनावर घेतले. जिल्हा परिषदेने दोन वर्गखोल्यांचे बांधकाम केले. लोकसहभागातून १० लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला.गावाच्या सुधारणेसाठी प्रथम व्यसनमुक्ती, कुपोषणमुक्ती मोहीम राबविण्यात आली. श्रमदानातून जलसंधारणाची कामे झाली.

Web Title: Success Story of Shivanagar Struggle on the material page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.