राहेगावात सक्शन पंप जिलेटीनने उडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:17 AM2019-04-22T01:17:54+5:302019-04-22T01:20:28+5:30

गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाºयाविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई करण्यात आली आहे.

The suction pump, which was released in Rahegaon, | राहेगावात सक्शन पंप जिलेटीनने उडविला

राहेगावात सक्शन पंप जिलेटीनने उडविला

Next
ठळक मुद्देअवैध वाळू उपसा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नांदेड तहसीलदारांची धाडसी कारवाई

अनुराग पोवळे।
नांदेड : गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाºयाविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील राहेगाव येथे गोदावरी नदीत सक्शन पंप टाकून वाळू उपसा केला जात होता. याबाबत नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांना तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहानिशा करताना नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तहसीलदार २१ एप्रिल रोजी राहेगाव येथे पोहोचले. हे पथक गावात दाखल होताच गोदापात्र परिसरात सामसूम पसरली. राहेगाव येथे एक सक्शन पंप गोदावरी नदीत बसवलेला आढळला. या पंपाद्वारे वाळू उपसा करुन त्याची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहतूक दिवसा न होता रात्री सुरू होती. गोदावरी काठावर वाळू उपसा करणाºया वाहनांसाठी धक्काही तयार करण्यात आला होता.
नायब तहसीलदार काकडे यांनी सदर बाब नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना कळविली. गोदावरी पात्रात सक्शन पंप असल्याची माहिती दिली. यावेळी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यावेळी सदर ठिकाणी वापरण्यात येणारा सक्शन पंप नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. या आदेशानुसार तहसीलदार अंबेकर यांनी जिलेटीनच्या कांड्याने सदर पंप नष्ट करण्याचे आदेश दिले.
या कारवाईदरम्यान स्वत: तहसीलदार अंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. राहेगाव येथे पोलीस बंदोबस्तही बोलावण्यात आला होता. नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक श्रीमती कावळे यांच्यासह पो.ना. एस.ए. काळे आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
गोदावरी पात्रात असलेल्या सक्शन पंपावर जिलेटीन कांड्या लावण्यात आल्या. या कांड्यांचा स्फोट घडवत सदर सक्शन पंप पूर्णपणे नष्ट करण्यात आला. हा सक्शन पंप ताब्यात घेणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर होते. गोदावरी पात्रातून तो बाहेर काढणे, त्याची वाहतूक करणे या सर्व बाबींना फाटा देत तो नष्ट करण्याचाच निर्णय वाळूमाफियांचे कंबरडे मोडणारा ठरला. नांदेड तालुक्यात केवळ दोन ठिकाणी वाळू घाटांना परवानगी देण्यात आली आहे. त्या घाटांची प्रक्रिया सुरू आहे. अशी असताना महसूल यंत्रणा मागील महिनाभरापासून निवडणूक कामात गुंतल्याचे पाहून वाळू माफियांनी थेट सक्शन पंपानेच वाळू काढण्यास प्रारंभ केला होता. या ठिकाणाहून रात्री वाळू उपसली जात होती. याची वाहतूक दिवसा केली जात होती. दरम्यान, या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ते फोन कोणाचे...
राहेगाव येथे नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने सक्शन पंप जप्त केल्याची कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना मोबाईलद्वारे अनोळखी नंबरवरुन मोबाईलद्वारे सदर प्रकरणाकडे कानाडोळा करावा, असे सांगण्यात येत होते. ते फोन नेमके कोणाचे होते, राहेगाव येथील वाळूमाफियांना कोणाचे पाठबळ होते, या बाबीचा पोलीस तपास करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा होणार नाही
अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल यंत्रणा कठोर कारवाई करणार हे राहेगावच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. वाळू माफियांना हा जणू इशाराच आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा केला जाणार नाही. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आदेशित करण्यात आले आहे. विशेष पथकाकडूनही जिल्ह्यात कारवाई केली जाणार आहे़ कोणतीही परवानगी नसताना चक्क सक्शन पंपाच्या सहायाने वाळू उपसा करणे ही वाळू माफियांची मोठी मजल होती. वाळू माफियांना धडा शिकविण्यासाठीच राहेगावची कठोर कारवाई करण्यात आली.                            -अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.


गेल्या महिनाभरापासून महसूल यंत्रणा निवडणूक कामात गुंतली होती. याचाच फायदा घेत तालुक्यात काही ठिकाणी अवैध वाळू उपसा केला गेला. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. येत्या आठ दिवसांत तालुक्यात विशेष मोहीम राबवत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध राहेगावप्रमाणेच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.             -किरण अंबेकर, तहसीलदार, नांदेड.

Web Title: The suction pump, which was released in Rahegaon,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.