नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:05 PM2024-10-04T18:05:35+5:302024-10-04T18:06:47+5:30

यावर्षी ८२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित

Sugarcane cultivation in Nanded, Hingoli, Parbhani, Latur districts decreased by 15 percent | नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत २०२४-२५ या हंगामात साखर कारखान्यांकडे २ लाख १० हजार ९९९ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंदणी झालेली आहे. असे असले तरी यंदा नांदेड विभागात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली असून, यावर्षी ८२ लाख ४८ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. नवीन गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामासाठी नांदेड जिल्ह्यातून ३३ हजार ७३२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातून २० हजार ७५६ हेक्टर, परभणी ५४ हजार ४०४ हेक्टर तर लातूर जिल्ह्यातून १ लाख २ हजार १०५ हेक्टर उसाचे क्षेत्र कारखान्यांकडे नोंदणी केलेले आहे. तर कृषी विभागाने १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र अंदाजित केले आहे. असे असले तरी एकंदरीत उसाच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे.

अडीच लाख टन ऊस हिंगोलीतील कारखाने गाळप करणार
नांदेड जिल्ह्यातील ऊस दरवर्षी हिंगोली जिल्ह्यात गाळपासाठी जातो. २०२४-२५ मध्ये साधारणता अडीच लाख मेट्रिक टन ऊस हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप करणार आहेत. तर लातूर जिल्ह्यातील कारखाने उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यातील २.८० लाख मे.टन गाळप करतील. तसेच परभणी जिल्ह्यातील कारखाने बीड व जालना जिल्ह्यातील ५ लाख मे.टन ऊस गाळप करीत असल्याने विभागातील एकूण गाळप ९०.८० मेट्रिक टन इतके होईल.

सरासरी उत्पादकता ६० ते ७० टन
विभागात सरासरी उत्पादकता ६० ते ७० मेट्रिक टन इतकी आहे. त्यात नांदेड जिल्हा उत्पादकता ७० टन, हिंगोली ७० टन, परभणी ६० तर लातूर ६५ टन इतकी आहे.

Web Title: Sugarcane cultivation in Nanded, Hingoli, Parbhani, Latur districts decreased by 15 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.