शेरेबाजीमुळे चिडलेल्या व्यापाऱ्यावर तरुणांचा जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:20+5:302021-07-09T04:13:20+5:30
हणेगाव येथील एका मुलीशी मैत्रीसंबंध ठेवत परधर्मीय युवकाने तिला फूस लावून पळवून नेले होते. १ मार्च रोजी पहाटे ३ ...
हणेगाव येथील एका मुलीशी मैत्रीसंबंध ठेवत परधर्मीय युवकाने तिला फूस लावून पळवून नेले होते. १ मार्च रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान मुलीने घरातील कपाटातून रोख २५ लाख रुपये व ७३ तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५२ लाखांचा मुद्देमाल सोबत नेला होता. पित्याने शेती खरेदीसाठी घरात २५ लाख रुपये रोख ठेवले होते. या प्रकरणी व्यापारी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार अर्जात इरशाद मोहोद्दीन अत्तार या तरुणाने माझ्या मुलीशी मैत्री करून तिला संमोहित केले आणि माझ्या घरी चोरी करण्यास प्रवृत्त केले असे नमूद केले. पोलिसांनी या घटनेची दखल न घेतल्याने वडिलांनी देगलूर न्यायालयात धाव घेतली. मे महिन्याच्या अखेरीस न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये मरखेल पोलिसांनी या प्रकरणी सदर मुलगी, गौस मोहसीन अत्तार, इस्माईल मोहसीन अत्तार, मोहसीन अब्दुल अत्तार यांंच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, मुलीचे वडील ७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान हणेगाव येथील बीदर रोडवर असलेल्या श्रीकांत घाेडेकर या हॉटेलमध्ये जेवणासाठी ते गेले होते. शेजारील टेबलवर बसलेले ५ युवक ‘बडे सावकार की लडकी भगाकर ले गये, क्या कर लिया’ अशी चर्चा करीत होते. त्यातील हैदर मगदुम बंदखडके हा बाहेर उठून आला असता शेजारील टेबलवर बसलेले व्यापारी यांनी तुम्ही माझ्या मुलीची चर्चा का करत आहात, अशी विचारणा केली. त्यावरून दोघांत वाद झाला. याच कारणावरून उपस्थित पाच युवकांनी व्यापाऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण करून मुलगी पळून गेल्याची तक्रार का दिली, तू नेहमीच पोलिसांकडे धाव घेतो असे म्हणत यानंतर पोलिसात तक्रार दिल्यास तुला जिवे मारून टाकू, अशी धमकीही युवकांनी व्यापाऱ्याला दिली.
दरम्यान, व्यापारी वडिलांनी मरखेल पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी जमीर मेहबुब साहब शेख, शब्बीर अब्दुल साहब बंदखडके, सद्दाम मेहबुबसाहब भासवाडे, हैदर मगदुम बंदखडके, अहमद शादुलसाब चौधरी (सर्व रा. हणेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. साहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार तपास करीत आहेत.