दोन वेळा मुलीची सोयरिक मोडल्याने व्यथित आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 07:16 PM2021-03-31T19:16:12+5:302021-03-31T19:17:29+5:30
दोन वेळा सोयरिक मोडल्यामुळे व्यथित मुलीच्या आईने २८ रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले.
भोकर (जि. नांदेड) : दोन वेळा मुलीची सोयरीक मोडल्यामुळे तिच्या आईने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी चौघांविरुद्ध भोकर पोलिसांत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वेळा सोयरिक मोडल्यामुळे व्यथित मुलीच्या आईने २८ रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी तात्काळ तिला उपचारांसाठी भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला दिला. २९ रोजी सकाळी उपचारादरम्यान नांदेड येथे तिचा मृत्यू झाला. याबाबत मृत महिलेच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी भोकर पोलीस ठाण्यात जाउन संताप व्यक्त केला व आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तक्रारीवरुन लक्ष्मण गोविंद चव्हाण, ऋषीकेश गोविंद चव्हाण, प्रफुल्ल गोविंद चव्हाण, गोविंद लक्ष्मण चव्हाण (सर्व रा. थेरबन) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी लक्ष्मण गोविंद चव्हाण याला पोलिसांनी अटक करून ३० रोजी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.