अनैतिक संबंधातून दाम्पत्याने संपवले जीवन; शिक्षकासह त्याच्या पत्नी, मुलीविरुद्ध गुन्हा दाखल
By प्रसाद आर्वीकर | Published: April 16, 2024 04:19 PM2024-04-16T16:19:06+5:302024-04-16T16:19:25+5:30
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या, त्यानंतर पत्नीनेही संपवले जीवन
- मारोती चिलपिपरे
कंधार : तालुक्यातील इमामवाडी येथे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पत्नीने देखील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पत्नीच्या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आरोपी शिक्षकासह त्याची पत्नी, मुलगी आणि मयत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामदास करेवाड (३५) आणि वर्षा रामदास करेवाड असे मयत पती-पत्नीची नावे आहेत.
तालुक्यातील इमामवाडी येथे रामदास हा आई, वडील, पत्नी, मुला-बाळांसह वास्तव्यास होते. रामदास हा कंधार येथे एका डॉक्टरकडे कंम्पाउंडर म्हणून काम करत होता तसेच ऑटो चालवून उदरनिर्वाह करीत होता. पत्नी वर्षा ही कंधार येथील जीएनएम कॉलेजमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीची ती उपाध्यक्ष होती. तर सुभाष कदम (रा. बामणी) हे याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या दोघांची ओळख झाली. त्यातच अधून-मधून वर्षांच्या घरी सुभाषचे येणे जाणे वाढले होते.
दरम्यान, एक महिन्यापूर्वी रामदास यास सुभाष कदम यांची मुलगी शीतल हिने फोन केला होता. तू तुझ्या बायकोला सांभाळ, तिचे माझे वडील सुभाष कदम यांच्या सोबत अनैतिक प्रेम संबंध सुरू आहेत, असे सांगितले. रामदास यांनी घरी सांगितल्याने नातेवाईकांनी सून वर्षा व सुभाष कदम यांना समज दिली होती. परंतु त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे रामदास सतत तणावाखाली राहत होता. त्यातच सुभाष कदम यांची बायको लता कदम व मुलगी शीतल कदम हे देखील रामदास यास वारंवार मानसिक त्रास देत. तुझ्या बायकोला निट सांभाळ, नाहीतर तिला खतम करुन टाकू, अशी धमकी देत असल्याने रामदास हा तणावात होता. शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तर पत्नी वर्षा करेवाड हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत रामदास करेवाड याची आई सुमनबाई सोपान करेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष रामराव कदम, वर्षा रामदास करेवाड (मयत), लता सुभाष कदम, शीतल सुभाष कदम यांच्या विरोधात कंधार पोलिस ठाण्यात १६ एप्रिल रोजी रात्री १२ च्या नंतर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनेश मुळे तपास करीत आहेत. आरोपीला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी कंधार पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.
मृत्यूपूर्वी चिठ्ठी व्हॉटसॲपवर...
रामदास करेवाड याने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्याच्या जीवितास काही बरेवाईट झाले तर त्यास सुभाष कदम सर व त्याची बायको वर्षा माणिका बोराळे ही जबाबदार राहील, असे लिहिलेले आहे. तसेच ती चिठ्ठी त्याने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर फॅमिली ग्रुप तयार करुन त्यावर टाकली होती.
मृताच्या आईने सांगितला घटनाक्रम
माझा मुलगा ऑटो चालून संसाराचा गाडा चालवीत होता. गावातील जिल्हा परिषद शाळेवर असलेले सुभाष कदम नावाचे शिक्षक माझ्या सुनबाईला शालेय समितीवर जवळपास दोन वर्षापासून घेतले होते. त्यामुळे माझ्या सुनबाईचे शाळेवर तर शिक्षकाचे घरी येणे जाणे वाढले होते. माझी सुनबाई कंधार येथील बाळंतवाडी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. या शिक्षकांनी तिला शाळेवर नेऊन सोडल्याची माझ्या मुलांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण वाढत गेले. आणि या शिक्षकाचे असलेल्या अनैतिक संबंधामुळे माझ्या मुलाने आपले जीवन संपविले. मयत मुलाची आई सुमनबाई करेवाड असे लोकमतशी बोलताना सांगितले.