‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत उन्हाळी परीक्षा जुलै, ऑगस्टमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:25+5:302021-06-19T04:13:25+5:30
पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ए, बी.कॉम,बी.एस्सी व इतर) अंतिम वर्षाच्या विद्यापीठ स्तरावरील परीक्षा १३ जुलै ते २४ जुलै तर पदवी अभ्यासक्रमाच्या ...
पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ए, बी.कॉम,बी.एस्सी व इतर) अंतिम वर्षाच्या विद्यापीठ स्तरावरील परीक्षा १३ जुलै ते २४ जुलै तर पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी व इतर) प्रथम व द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन स्तरावर क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा २६ जुलै ते १० ऑगस्टदरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए,एम.कॉम,एम.एस्सी व इतर) अंतिम वर्षाच्या विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षा २६ ते ३१ जुलै दरम्यान तर पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए, एम.कॉम, एम.एस्सी व इतर) महाविद्यालयीन स्तरावर क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा २ ते १० ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम (अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र व इतर) पदवी, पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या विद्यापीठ स्तरावरील परीक्षा २० ते ३१ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रम (अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र व इतर) प्रथम, द्वितीय, तृतीय (अंतिम वर्ष वगळून) महाविद्यालयीन स्तरावर क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा ५ ते १४ ऑगस्ट, सर्व पदविका एक वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षा २६ ते ३१ जुलै, विद्यापीठ परिसरातील सर्व संकुले, उपकेंद्र लातूर व परभणी येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १० ते २० जुलै, विद्यापीठ परिसरातील सर्व संकुले, उपकेंद्र लातूर व परभणी येथील प्रथम वर्षाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा २० जुलै ते १० ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा १३ ते २४ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत.
या सर्व परीक्षा बहुपर्यायी (एम.सी.क्यु) प्रश्नपत्रिकेद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. पदवी परीक्षेसाठी ४० बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहेत. त्यासाठी एक तासाचा कालावधी आहे. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण आहे. पदव्युत्तर परीक्षेसाठी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असून एका तासात ४० प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण आहे. थोडक्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ५० पैकी ४० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळ व विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये सदर वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यावयाचा निर्णय झाला आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.