सुप्रियाताई सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरताहेत; चित्रा वाघ यांची जोरदार टीका
By शिवराज बिचेवार | Published: October 9, 2023 06:12 PM2023-10-09T18:12:45+5:302023-10-09T18:14:31+5:30
डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारीवर फुटते.
नांदेड : महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडाऱ्यात दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. अन् आता नांदेडला येऊन सुप्रियाताई सुळे या आरोप करून गेल्या. तुमच्या वेळचे सांगता येत नसले तर तसे सांगा, मी येते सांगायला. तुम्ही सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरत आहात, असा टोला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी लगावला.
शासकीय रुग्णालयात पाहणी करण्यासाठी चित्राताई वाघ सोमवारी नांदेडात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, मृत्यू पावलेल्या घटनेचे समर्थन नाही. परंतु रुग्णालयात २०२० पासून आतापर्यंत दररोज सरासरी होणारे मृत्यू हे १२ वाजेच्या जवळपास आहेत. ज्यावेळी सगळे नाकारतात तेव्हा घरी नेण्यापेक्षा सरकारीत दाखल करू म्हणून इकडे लोक येतात. डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारीवर फुटते. परंतु यावरून विरोधी पक्षांना राजकारण करायचे आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट करणार, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात किती रुग्णालयांचे ऑडिट झाले? असा सवालही वाघ यांनी केला.
आशा वर्कर गोळ्या देतात, महिला घेत नाहीत
ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर गोळ्या देतात, परंतु महिला त्या घेत नाहीत. अशी माहिती बालरोग विभागातील काही बाळांच्या आईने दिली. डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या घेतल्या असत्या तर बाळ सुदृढ झाले असते हे मी त्यांना सांगितले. आपण त्यांना गोळ्या देऊ शकतो. परंतु गिळायला देऊ शकत नाही, असेही वाघ म्हणाल्या.