२ महिन्यांत ३९६ महिलांवर शस्त्रकिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:52+5:302021-03-08T04:17:52+5:30

वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजन हा प्रभावी मार्ग मानला जातो. मात्र, पुरुषांमध्ये अद्याप त्याबाबत फारशी जागृती नाही. गेल्या ...

Surgery on 396 women in 2 months | २ महिन्यांत ३९६ महिलांवर शस्त्रकिया

२ महिन्यांत ३९६ महिलांवर शस्त्रकिया

Next

वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजन हा प्रभावी मार्ग मानला जातो. मात्र, पुरुषांमध्ये अद्याप त्याबाबत फारशी जागृती नाही. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली असता महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या असून त्या तुलनेत पुरुषांचा वाटा कुटुंब नियोजनात अत्यंत कमी आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया म्हणजे केवळ स्त्री शस्त्रक्रिया असे एक सूत्रच तयार झाले आहे. प्रबोधनातील कमतरतेमुळेच पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेबाबत गैरसमज असल्याचे आढळून येतात. स्त्रियांच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदीची प्रक्रिया सोपी आहे, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात. पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच पुढे केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आरोग्य विभागाने नसबंदीसाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला असला तरी २०१८-१९ मध्ये एकूण ५०२ महिलांच्या उद्दिष्टापैकी ३३८ शस्त्रक्रिया झाल्या असून पुरुषाच्या शस्त्रक्रिचे ३५ चे उद्दिष्ट असताना केवळ ७ पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या होत्या. तर जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत कोरोनामुळे तालुक्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराला ब्रेक लागला होता. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांत प्रा.आ. केंद्र आष्टा ६६, सिंदखेड ८४, इवळेश्वर ६४, माहूर ग्रामीण रुग्णालय १८२ अशा एकूण ३९६ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर वानोळा व वाई बा. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशन थेटर नादुरुस्त असल्याने या ठिकाणी एकही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.

सद्य:स्थितीला शस्त्रक्रियेच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली असून पुरुषांना शस्त्रक्रियेनंतर थोड्याच वेळात घरी जाता येते, तर महिलांना मात्र रुग्णालयात दाखल व्हावे लागत असतानाही त्यांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यास पुरुषांची मानसिकता अजूनही तयार होत नसल्याचे गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून समोर आले आहे.

शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष :

वेदनाविरहित केवळ तीन मिनिटांच्या शस्त्रक्रियेचा पर्याय त्याच बरोबर प्रोत्साहनपर अनुदान १४५० रु. मिळत असूनही कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुषाचा सहभाग अत्यल्प दिसतो. शासकीय रुग्णालयात कुटुंबकल्याण नियोजन शस्त्रक्रिया मोफत केली जात असली तरी पुरुषांच्या शस्त्रक्रिया अद्याप स्त्रियांच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. पुरुषांनी पुढाकार घेतला तरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेतून महिलांची सुटका होऊ शकते.

शस्त्रक्रिया सोपी :

स्त्रीपेक्षा पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया खरे तर अधिक सुलभ व सोपी आहे. यात भूल दिली जात नाही. कोणतीही चिरफाड न करता बिनटाका शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर केवळ पंधरा मिनिटे रुग्णालयात राहावे लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे वैवाहिक जीवनात कोणतीही बाधा येत नाही. प्रत्यक्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर पुरुषत्व जाते, नपुंसकत्व, कमजोरी येते, असा मोठा गैरसमज आहे. त्यामुळेच पुरुष वर्ग नसबंदीकडे पाठ फिरवतात. असे चित्र माहूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पुरुषांचा नकार असणे यासाठी आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृती सर्वांत मोठे कारण आहे. शस्त्रक्रियेमुळे त्रास होईल असा गैरसमज अनेकांना अजून आहे. अनेक वेळा पतीच्या शस्त्रक्रियेसाठी पत्नीचाच नकार असतो हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. पुरुषांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुढे येणे गरजेचे आहे. -डॉ. साहेबराव भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूर.

Web Title: Surgery on 396 women in 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.