जामिनाचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने डांबर घोटाळ्यातील आरोपीची शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:53 PM2019-02-05T18:53:28+5:302019-02-05T18:55:23+5:30
न्यायालयाने संत्रे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़
नांदेड :सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपीपैकी कंत्राटदार सी.एस. संत्रे हे गेल्या साडे चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते़ परंतु जामीनासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने संत्रे यांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली़ न्यायालयाने संत्रे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़
रस्ते बांधकाम करणाऱ्या नांदेडातील पाच कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता शासनाची फसवणुक करीत डांबरशेठ या खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी केले होते़ परंतु डांबर खरेदी ही शासकीय कंपनीकडून केल्याच्या बनावट पावत्या त्यांनी बिले उचलताना जोडल्या होत्या़ याबाबत शासकीय कंपनीच्या खुलाशानंतर या घोटाळ्याचे बिंग फुटले होते़
या प्रकरणात जवळपास १२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहा कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यामध्ये निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा, मोरे कन्स्ट्रक्शनचे मनोज मोरे, सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख, संत्रे कन्स्ट्रक्शनचे सी़एस़संत्रे, तसेच नुसरत कन्स्ट्रक्शनचे मोईज आणि एस़जी़पद्मावार अशा सहा जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी मनोज मोरे आणि भास्कर कोंडा यांना त्वरित अटक केले होते़ त्यानंतर तब्बल १०१ दिवसानंतर या दोघांना जामीन मिळाला होता़ तर इतर आरोपी मात्र फरारच होते़ त्यात सतिष देशमुख यांचा सहभाग नसल्याचे पत्र बांधकाम विभागाने पोलिसांना दिले़ त्यामुळे त्यांचे या गुन्ह्यातून नाव वगळण्यात आले़ तर सी़एस़संत्रे, मोईज आणि एस़जी़पद्मावार हे तिघे मात्र पोलिसांना गुंगारा देत होते.