नांदेड जिल्ह्यात एकीकडे वाळू घाटांचे सर्वेक्षण, दुसरीकडे उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:05 AM2018-09-18T01:05:43+5:302018-09-18T01:06:08+5:30
जिल्ह्यात २०१८-१९ साठीच्या वाळू घाटांचे सर्व्हेक्षण केले जात असून हे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील कोणते वाळू घाट लिलावात जातील, हे स्पष्ट होईल. एकीकडे हे सर्व्हेक्षण सुरू असताना जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात वाळू माफियांनी आपला अवैध वाळू उपसा सुरू केला आहे.
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात २०१८-१९ साठीच्या वाळू घाटांचे सर्व्हेक्षण केले जात असून हे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील कोणते वाळू घाट लिलावात जातील, हे स्पष्ट होईल. एकीकडे हे सर्व्हेक्षण सुरू असताना जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात वाळू माफियांनी आपला अवैध वाळू उपसा सुरू केला आहे.
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये वाळू उपसासाठी सर्व्हेक्षणात पात्र ठरलेल्या ८९ घाटांपैकी केवळ ३९ वाळू घाटांचा लिलाव झाला होता. या लिलावातून जिल्हा प्रशासनाला २२ कोटी १२ लाख ६० हजार १२६ रुपयांचा महसूल मिळाला होता.
यावर्षीही वाळू लिलावासाठी घाटांचे सर्व्हेक्षण ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. महसूल विभाग, भूजल सर्व्हेक्षण, तालुका भूमिलेख विभाग, संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी हे सर्व्हेक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. महिनाभरात सर्व्हेक्षण पूर्ण होऊन पात्र ठरलेल्या घाटांचा लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्रशासकीय पातळीवर घाटांचे सर्व्हेक्षण सुरू असले तरी प्रत्यक्षात दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुच आहे. उमरी तालुक्यातील पंचायत समिती सदस्याचे जेसीबी मशिन पकडली. नायगाव तालुक्यातही पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनावर कारवाई केली.
दुसरीकडे महसूल विभागाने मात्र जिल्ह्यात एकही वाळू घाट सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. नायगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी जूनपासून तालुक्यात एकाही वाळू घाटावरुन उपसा सुरू नसल्याचे सांगितले. तर तालुक्यातील बळेगाव, मेळगाव यासह उमरी तालुक्यातील काही घाटावरुन वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व्हेक्षण नेमके कोणत्या घाटावर सुरू आहे, हा प्रश्नही पुढे आला आहे.
गतवर्षी सर्वाधिक बोली देगलूर तालुक्यातील शेवाळा घाटाला लागली होती. १ कोटी ९० लाख ६ हजार ६९९ रुपयांनी घाट गेला तर शेळगाव १ हा घाट १ कोटी ८९ लाख ९ हजार ९६६ रुपयांना लिलावात गेला होता.
बिलोली तालुक्यातील बोळेगाव-१ या वाळू घाटालाही १ कोटी ११ लाख ३१ हजार १६६ रुपयांची बोली लागली होती तर नांदेड तालुक्यातील भणगी घाट १ कोटी ६५ लाख ६९ हजार १८० रुपयांना गेला होता. १ कोटीहून अधिक रक्कम मिळालेले हे घाट होते.
सर्वाधिक वाळू चोरी नायगाव तालुक्यात
जिल्ह्यात चालू वर्षात सर्वाधिक वाळू चोरी ही नायगाव तालुक्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ३१ आॅगस्ट पर्यंत नायगाव तालुक्यात १६० ठिकाणी वाळू चोरी पकडण्यात आली आहे. प्रशासनाने १२ हजार ८४८ ब्रास वाळू साठा जप्त केला. या वाळू साठ्याताून ४२ लाख २२ हजार ९०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाळूसाठा पकडण्याच्या घटना सर्वाधिक असतानाही अजूनही या तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. उमरी तालुक्यातही १३१ वाळूसाठे जप्त करण्यात आले असून ११ हजार ९०१ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. ८१ साठ्यांचा लिलाव करण्यात आला असून १ कोटी १ लाख ४९ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. बिलोली तालुक्यातही ४१ ठिकाणी अवैध साठे जप्त करण्यात आले आहेत. ९ हजार ६७२ ब्रास वाळू जप्त करण्यात आले असून त्यातून १ कोटी १६ लाख ६६ हजार ९९३ रुपयांचा महसूल मिळाला आहे.