वाळू ठेकेदारांना गोपनीय माहिती पुरवणारे जिल्हा खनिकर्म अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:40 PM2017-11-28T23:40:41+5:302017-11-28T23:40:41+5:30
जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेत गोपनीय माहिती खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकाºयानेच वाळू ठेकेदारांना पुरविल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला़
नांदेड : जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेत गोपनीय माहिती खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकाºयानेच वाळू ठेकेदारांना पुरविल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला़ याप्रकरणी खनिकर्म अधिकारी रणज्योतसिंघ सोखी यांना तडकाफडकी निलंबित करून वाळू घाटांची लिलाव प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे़
जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-निविदा प्रक्रियेला ६ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला होता़ २३ नोव्हेंबर पर्यंत आॅनलाईन ई-निविदा भरण्याची मुदत होती़ २४ नोव्हेंबर रोजी प्राप्त निविदांची तांत्रिक माहिती तपासणी करण्यात आली़ या तांत्रिक तपासणीत जिल्ह्यातील २९ घाटांसाठी ८० निविदाधारकांनी ई-निविदा सादर केल्या होत्या़ या प्रक्रियेत वाळू घाटांसाठी आलेल्या निविदाधारकांची माहिती गोपनीय ठेवण्यात येते़ मात्र ही माहिती काही ठेकेदारांपर्यंत पोहोचल्याची बाब जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना कळाली़ त्यानंतर संपूर्ण खनिकर्म विभागातील कर्मचारी तसेच अधिकाºयांची चौकशी करण्यात आली़ त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली़
या सर्व चौकशीत खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकारी रणज्योतसिंघ निर्मलसिंघ सोखी यांनीच कार्यालयीन ई-मेलवरून गोपनीय माहिती आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केली आणि ती माहिती वाळू ठेकेदारांना पुरवल्याची बाब उघड झाली आहे़ तशी कबुलीही सोखी यांनी दिली आहे़ त्यामुळे त्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी काढले आहेत़ त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत़
या सर्व प्रकारानंतर १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे़ ही संपूर्ण प्रक्रिया आता नव्याने घेण्याचेही आदेशही देण्यात आले आहेत़ ३० नोव्हेंबरपासून फेरनिविदा प्रक्रिया होणार आहे़
दरम्यान, जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून रणज्योतसिंघ सोखी हे १ आॅगस्ट २०१६ रोजी नांदेडमध्ये सरळ सेवेने रूजू झाले होते़ त्यांची पहिलीची नियुक्ती नांदेडमध्ये झाली होती़ नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो़ आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून जिल्ह्यातील वाळूला मागणी असते़