अपघात की घातपात ? वाघाळा परिसरात तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:04 PM2021-06-17T14:04:07+5:302021-06-17T14:04:36+5:30
गळ्यावरती खरचटल्याचे व्रण आहेत. यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नांदेड: नांदेडच्या 'सिडको' परिसरातील वाघाळा रस्त्यावर १७ जून रोजी सकाळी एक दुचाकी आडवी पडलेली होती. दुचाकीजवळच एका तरूणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना अपघाताची आहे की, घातपाताची आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट होवू शकले नाही.
घटनास्थळी पडून असलेल्या दुचाकीच्या नंबरवरूनच मयत तरूणाची ओळख पटली आहे. बाजीराव पंडीतराव हंबर्डे-देशमुख (वय-३४ वर्षे, व्यवसाय- सिमेंट विक्रेते, रा. विष्णूपुरी, नांदेड) असे मयत तरूणाचे नाव आहे. प्रथमदर्शनी मयत बाजीराव हंबर्डे यांच्या शरीरावर कुठेही शस्त्राचे वार वगैरे दिसले नसले, तरी त्यांच्या गळ्यावरती खरचटल्याचे व्रण आहेत. यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती समजताच नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे आणि नांदेड ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे, 'स्थागुशा'चे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, नांदेड 'ग्रामीण' ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, 'डीबी'चे पोउपनि. शेख असद, पोउपनि. आनंद बिचेवार तसेच त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचवेळी, घटनास्थळी श्वानपथकाच्या सहाय्याने तपास सुरु आहे.