स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे श्रीश्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात निषेधाचे पोस्टर, पोलिसांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:56 PM2023-02-02T14:56:45+5:302023-02-02T14:56:45+5:30
याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षासह सात कार्यकर्त्यांना आज पहाटे जेरबंद केले.
नांदेड: बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षासह सात कार्यकर्त्यांना आज पहाटे जेरबंद केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडिओवरून श्री श्री रविशंकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री एका कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या मामा चौक, कौठा परिसरातील मैदानात बुधवारी ( दि. १ ) संध्याकाळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व अध्यात्मिक गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचा महासत्संगाचा अर्थात गुरूवाणीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तिरूपती भगनुरे (रा. मगनपुरा, नांदेड), माधव शिवाजी वडवळे, शिवराज दत्ता जाधव (रा. कापसी ता. लोहा), निरंजन साहेबराव जाधव (रा. पुयडवाडी) व अजित प्रल्हादराव इंगळे (रा. गणेश नगर, नांदेड) हे निषेधाचे पोस्टर घेऊन कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप करत श्रीश्री रविशंकर यांनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.
याप्रकरणी अंमलदार बालाजी दंतापल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. आनंद बिचेवार यांच्या पथकाने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव दादाराव देवसरकर, जिल्हाध्यक्ष सदानंद संजय पुयड यांच्यासह तिरूपती भगनुरे (रा. मगनपुरा, नांदेड), माधव शिवाजी वडवळे, शिवराज दत्ता जाधव (रा. कापसी ता. लोहा), निरंजन साहेबराव जाधव (रा. पुयडवाडी) व अजित प्रल्हादराव इंगळे (रा. गणेश नगर, नांदेड) आरोपींना जेरबंद केले.