स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:36 PM2022-06-20T12:36:30+5:302022-06-20T13:52:15+5:30
आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत बी.एस्सी तृतीय वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्येच प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन पेपर रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. सदरील दोन्ही पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून बी. एस्सीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यात १४ जून रोजी बी. एस्सी तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रासाठी परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये पेपर कोड एसबी-०६९ आणि एसबी - ०७१ या विषयांचा समावेश होता. सदरील पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. यासंदर्भात आलेल्या तक्रारी आणि सदर प्रकारामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करण्याचे आदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सदर पेपर एक महिन्यानंतर जुलै महिन्यात होणार आहेत.
दोन्ही पेपर पुन्हा एकाच दिवशी
बीएस्सी तृतीय वर्षाचे रद्द करण्यात आलेले पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या नियोजनानुसार दोन्ही विषयाची पुनर्परीक्षा १६ जुलै रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत होईल. यामध्ये पेपर कोड - एसबी ०६९ (गणित) आणि पेपर कोड एसबी - (प्राणिशास्त्र) विषयांचा समावेश आहे. दोन्ही पेपर एकाच वेळेत एकाच दिवशी होणार आहेत.
घडल्या प्रकाराची चौकशी सुरू
लातूर जिल्ह्यातील एका केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आल्या. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. परीक्षेत पारदर्शकात राहावी म्हणून दोन्ही पेपर रद्द केले आहेत. १६ जुलै रोजी पुनर्परीक्षा घेऊन निकालदेखील वेळेवर लावला जाईल.
- डी. एम. नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.