'प्रेम अन् त्यागाचे प्रतिक'; यकृत दानकरून पत्नीने दिले पतीला नवजीवन

By श्रीनिवास भोसले | Published: August 19, 2023 01:19 PM2023-08-19T13:19:23+5:302023-08-19T13:19:58+5:30

दाम्पत्यावर चालली अनेक तास शस्त्रक्रिया

'Symbol of Love and Sacrifice'; Wife gave new life to husband by donating liver | 'प्रेम अन् त्यागाचे प्रतिक'; यकृत दानकरून पत्नीने दिले पतीला नवजीवन

'प्रेम अन् त्यागाचे प्रतिक'; यकृत दानकरून पत्नीने दिले पतीला नवजीवन

googlenewsNext

- गणेश जाधव
बाराहाळी :
पत्नींमध्ये होणारे भांडण - तंटे आणि त्यातून घडणाऱ्या घटना आपण नेहमीच पाहतो. परंतु, बाराहाळी येथील एका उच्च शिक्षित पत्नीने पतीला यकृत देऊन पतीचा पुनर्जन्मच घडवून आणला आहे. या आधुनिक सावित्रीने पती - पत्नीच्या दृढ नात्याला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.

मुखेड तालुक्यातील बाराहाळी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. बळवंत देशपांडे हे विद्या विकास उच्च माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सुप्रिया देशपांडे याही उच्च विद्याविभूषित आहेत. या दाम्पत्याचा सुखी संसार सुरू असतानाच एक ते दीड वर्षापासून प्रा. बळवंत देशपांडे यांना पोटाच्या आजाराने ग्रासले. सुरुवातीला सहज वाटणारी पोटदुखी नंतर मात्र जीवघेणी ठरत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे सुरुवातीला नांदेड व नंतर हैदराबाद येथील नामांकित दवाखान्यांमध्ये उपचार घेऊनही पोटदुखीचा त्रास काही कमी होत नव्हता.

पोटदुखी वाढतच असल्याने प्रकृती खालावू लागली. पत्नी सुप्रिया देशपांडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन पती बळवंत देशपांडे यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर धक्कादायक कारण समोर आले. प्रा. बळवंत देशपांडे यांचे यकृत ९८ टक्के खराब झाले होते. यकृत त्वरित न बदलल्यास जिवावर बेतणार, हे निश्चित होते. देशपांडे कुटुंबावर नियतीने केलेला हा आघात सहन करीत असतानाच डॉक्टरांशी सल्लामसलत करून पत्नी सुप्रिया यांनी स्वतःचे यकृत पतीला देण्याचा निश्चय केला. पत्नी सुप्रिया देशपांडे यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह आल्या.

पती - पत्नीचे लिव्हर (यकृत) मॅच होणार असल्याचे वैद्यकीय पथकाने जाहीर केले. अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया दोघांवरही होणार असल्याने सर्वजण हवालदिल झाले होते. मात्र, देशपांडे पती-पत्नींनी स्वतःला सावरून आलेल्या संकटाला मोठ्या हिमतीने सामोरे जाण्याचा निर्धार केला. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे यकृत विभागप्रमुख डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. निनाद देशमुख, डॉ. झिरपे, डॉ. अकोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बळवंत देशपांडे यांच्यावर यकृत बदलाची शस्त्रक्रिया केली. सुप्रिया देशपांडे यांच्यावर ८ तास, तर बळवंत देशपांडे यांच्यावर तब्बल १० तास शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेनंतर केवळ दहा ते पंधरा दिवसांत सुप्रिया व बळवंत देशपांडे या पती - पत्नीची प्रकृती पूर्वपदावर आली आहे. सुप्रिया यांनी पतीसाठी केलेल्या त्यागाचे बाराहाळी परिसरात कौतुक केले जात आहे.

Web Title: 'Symbol of Love and Sacrifice'; Wife gave new life to husband by donating liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.