काटकळंबा येथील मजुरांचा कामासाठी टाहो
By Admin | Published: November 6, 2014 01:40 PM2014-11-06T13:40:25+5:302014-11-06T13:40:25+5:30
कंधार तालुक्यातील मौजे काटकंळबा येथे दुष्काळामुळे गेल्या चार महिन्यांपासून मजुरांच्या हाताला काम नाही.
नांदेड : कंधार तालुक्यातील मौजे काटकंळबा येथे दुष्काळामुळे गेल्या चार महिन्यांपासून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने या ठिकाणी योजनेतील कामे सुरु करुन मजुरांना काम द्यावे, या मागणीसाठी जिल्हाकचेरीसमोर आंदोलन सुरु केले आहे.
रोहयोअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारणाचे काम करावे, अवर्षणामुळे नापिकी झाली असून दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, नापिकीमुळे शेतकर्यांना एकरी २५ हजार रुपये पीक अनुदान त्वरित मंजूर करुन वाटप करावे, शेतकर्यांवरील सर्व कर्ज व वीजबिल माफ करावे, भारनियमन बंद करुन वीजपुरवठा सुरळीत करावा, रबीच्या पेरणीसाठी नव्याने कर्ज द्यावे, शासनाच्या धोरणानुसार पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी इको व्हिलेज योजना लागू करावी, राष्ट्रीय पीक योजनेचे मंडळनिहाय निकष बदलून गावनिहाय निकष लागू करावे, पीक आणेवारीचे निकष बदलून वास्तव निकषाआधारे आणेवारी काढावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
यावेळी बाबूराव शंकरराव बसवदे, प्रा. बालाजी कोम्पलवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.