तलाठ्याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:18 AM2021-03-26T04:18:10+5:302021-03-26T04:18:10+5:30
तामशात २ लाखांची घरफोडी हदगाव-तामसा शहरातील शिवाजीनगर येथील बाबू चव्हाण यांच्या घरी २२ मार्च रोजी चोरीची घटना घडली. चव्हाण ...
तामशात २ लाखांची घरफोडी
हदगाव-तामसा शहरातील शिवाजीनगर येथील बाबू चव्हाण यांच्या घरी २२ मार्च रोजी चोरीची घटना घडली. चव्हाण हे दाराला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हदगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
ग्रा.पं.चा वीज पुरवठा खंडित
बारड-येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या वीज बिलाची अडीच कोटी रुपये थकीत आहे. रक्कम वसुलीसाठी महावितरणने पाणी पुरवठ्याची वीज खंडित केल्याने लोकांना आता भटकंती करण्याची वेळ आली. ऐन उन्हाळ्यात ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव म्हणाले की नागरिकांना ग्रामपंचायतचा कर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवपांदण रस्त्याचे भूमिपूजन उमरी-तालुक्यातील वाघाळा-बितनाळ शिवपांदण रस्त्याचे भूमीपूजन तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जी.जी. कदम, बालाजी नासलवाड, सदाशिव कोळेकर, धाराजी वाघमारे, शेख लालनसाब, माणिक आरसेवाड, लक्ष्मण आरसेवाड, गोविंद गनपोलवाड, साईनाथ तोटेवाड आदी उपस्थित होते.
फरार आरोपीला अटक
नायगाव-केबल चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. २०१६ मध्ये ही घटना मरवाळी, ता. नायगाव येथे घडली होती. सुरेश लोहकरे असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तपास आनंद वाघमारे करीत आहेत.
कापसी उपकेंद्र थकबाकीमुक्त
लोहा-कापसी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २८ गावांत वीज वितरण कंपनीने कृषी वीज धोरण लोकांना सांगितले. कृषी पंप धारकांनी एकरकमी रक्कम भरली. त्यामुळे थकबाकी मुक्तीत कापसी उपकेंद्र आघाडीवर आले. या कामी उपकार्यकारी अभियंता एस.जी. दवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता गुरुप्रसाद देसाई, एस.बी. मठवाले, व्ही.आय. शेरीयाल, सोपान जाधव, माधव हिंदोळेकर आदींनी परिश्रम घेतले.
आरटीओ कार्यालय बंद
नांदेड-नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान लॉकडाऊन सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील तसेच शिबिर (कॅम्प) कार्यालयातील सर्व कामकाज संचारबंदी कालावधीत बंद राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
नवीन अंगणवाडी
लोहा-इंदिरानगर लोहा येथे नवीन अंगणवाडी सुरू झाली. २३ मार्च रोजी पालिका मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते अंगणवाडीचे उद्घाटन झाले. यावेळी अधीक्षक सावंत, मारोती शेळके, तुकाराम दाढेल, शंकर वाघमारे, चांदू दाभाडे, यमुना याडे, कुंभारे, शकुंतलाबाई दाढेल, दाभाडे आदी उपस्थित होते.
सफाई कामगार कामावर
धर्माबाद-लेखी आश्वासनानंतर धर्माबाद पालिकेतील सफाई कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले. नगर परिषदेच्या ११ सफाई कामगारांच्या वारसांना नियमानुसार कामावर घेण्याची मागणी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. कार्यालयीन अधीक्षक बाबुराव केंद्रे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.