Talathi Exam: जोडवे अन् मंगळसूत्र काढून या; शासनाचा फतवा की परीक्षा केंद्राची मनमानी?
By श्रीनिवास भोसले | Published: August 21, 2023 07:35 PM2023-08-21T19:35:17+5:302023-08-21T19:35:50+5:30
अनेक परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना नियमाच्या नावाखाली महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या आणि पायातील जोडवे काढायला लावले.
नांदेड : तलाठी परीक्षेत नाशिक, वाशिम जिल्ह्यांत हायटेक कॉपीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर नियमावलीच्या नावाखाली महिला परीक्षार्थ्यांसाठी अजब फतवा काढण्यात आला. त्यामुळे चक्क सौभाग्यवती महिलांच्या पायातील जोडवे, हातातील बांगड्या अन् गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना सोमवारी परीक्षेला सामोरे जावे लागले. पहिल्याच श्रावण सोमवारी सौभाग्याचे अलंकार काढावे लागल्याने महिला परीक्षार्थ्यांनी या धोरणाचा निषेध नोंदविला.
अनेक वर्षांपासून शासनाकडून शासकीय कार्यालयांतील रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली. सध्या मेगा भरतीच्या नावाखाली शासनाकडून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून तलाठी भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, ही परीक्षा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत आहे. नाशिक आणि वाशिम जिल्ह्यांत हायटेक कॉपीचा प्रकार उघड झाला. मायक्रोफोन, मायक्रो स्कॅनरचा केलेला वापर पाहून पोलिसही अवाक झाले होते. परंतु, अशा बोटावर मोजण्याएवढ्या परीक्षार्थ्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सामान्य, कष्ट करून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोमवारी नांदेड शहर व परिसरातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना नियमाच्या नावाखाली महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या आणि पायातील जोडवे काढायला लावले. पायातील जोडवे अन् हातातील काचेच्या बांगड्या निघत नव्हत्या. दुसरीकडे रिपोर्टिंग टाइम होत होता. अशा परिस्थितीत काही महिला परीक्षार्थ्यांनी अक्षरश: दगडाने बांगड्या फोडल्या तर पायातील जोडवे अडकित्त्यांनी तोडून काढले. परंतु, जोडवे अन् बांगड्या तोडून काढताना अनेक महिलांना अश्रू रोखता आले नाही. ऐन श्रावण सोमवारी महिलांना त्यांच्या सौभाग्याचे अलंकार काढून ठेवण्याची वेळ शासनाच्या या अजब फतव्यामुळे ओढावली.
नांदेड, अमरावती केंद्रांवर घडला प्रकार
नांदेडसह अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जोडवे, बांगड्या अन् मंगळसूत्र काढून ठेवायला लावले. हा नियम शासनाने घालून दिला की केंद्रावरील यंत्रणेचा कारभार होता, हे कळायला मार्ग नाही. परंतु, तलाठी परीक्षेच्या अनुषंगाने दिलेल्या नियमावलीत कुठेच दागिने काढून ठेवण्याचा उल्लेख नाही. उलट धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी त्या-त्या धर्मातील पारंपरिक ड्रेस, दागिने घालणाऱ्या परीक्षार्थ्यांची वेगळी तपासणी करण्याच्या सूचना आहेत. काही परीक्षा केंद्रांवर जोडवे अन् गळ्यातील मंगळसूत्र, कानातील डोरले पांढऱ्या चिकटपटीने झाकून टाकले.