मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना टार्गेट; पोलिसांच्या सापळ्यात मंगळसूत्र चोरटे अलगद अडकले
By शिवराज बिचेवार | Published: June 7, 2023 07:15 PM2023-06-07T19:15:11+5:302023-06-07T19:15:24+5:30
पोलिसांनी पहाटे पाच वाजेपासूनच सापळा रचला होता.
नांदेड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यानंतर पोलिसांनी पहाटे पाच वाजेपासूनच या परिसरात सापळा रचला होता. त्यात दुचाकीवरून तिघे संशयित जात असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चोरीतील दागिन्यांसह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
२९ मे रोजी अनोळखी तिघांनी रेल्वेस्टेशन ते यशवंत महाविद्यालय रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण हिसकाविले हाेते. त्यानंतर ४ जून रोजी सकाळी साडे सहा वाजता मगनपुरा भागात आणखी एका महिलेचे दीड तोळ्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. या रस्त्यावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलांना हे चोरटे टार्गेट करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पहाटे पाच वाजताच या परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दुचाकीवरून तिघे जण पळ काढत असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. ओंकार उर्फ विराट राजेश भूमक (रा. पांगरी), अर्जुन पुरुषोत्तम मोरे (रा. विष्णूनगर) आणि एका अल्पवयीन मुलाचा त्यात समावेश होता. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वा लाख रुपयाचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त केल्या.