गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले
By शिवराज बिचेवार | Published: June 17, 2023 07:43 PM2023-06-17T19:43:18+5:302023-06-17T19:45:46+5:30
या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदेड : सातवी उत्तीर्ण झालेल्या मुलीचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याध्यापिकेने ६०० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४०० रुपये स्वीकारताना मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी किनवट येथे घडली.
तक्रारदार यांची मुलगी किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे मुलीचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तिचे वडील १६ जून रोजी शाळेत गेले होते. यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका विणा नेम्मानीवार यांच्याकडे टीसीची मागणी केली. त्यावर नेम्मानीवार यांनी टीसी काढण्यासाठी ६०० रुपये लागतील असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने ६०० रुपये कशासाठी असा प्रश्न केला. हे पैसे द्यावेच लागतील असे मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी ठणकावले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीने लाच मागणी पडताळणी केली असताना मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी तडजोडीअंती ४०० रुपयांची मागणी केली. तसेच या पैशाची कोणतीही पावती मिळणार नाही असेही सांगितले. त्यानंतर शनिवारी शाळेतच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांना ४०० रुपये दिले. तसेच पावतीची मागणी केली; परंतु नेम्मानीवार यांनी पावती देण्यास नकार दिला. त्यानंतर नेम्मानीवार यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.