शिक्षक, मुख्याध्यापकांच्या प्रयोगशीलतेने रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:35 AM2019-06-17T00:35:53+5:302019-06-17T00:37:40+5:30
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे.
नितेश बनसोडे।
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे.
८५० लोकसंख्या व ६०० मतदार असलेल्या दहेगावात आदिवासी समाजाचे १०० टक्के वास्तव्य आहे. शाळेची स्थापना १९६६ मध्ये झाली असून सुरुवातीपासूनच शाळेला ग्रामस्थांनी भरघोस पाठिंबा देत शिक्षणाची कास धरल्याने येथे कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांचाही आनंद द्विगुणित झाला आहे. किंबहुना त्यामुळेच शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची परंपरा आजतागायत कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शासनाचे नवे उपक्रम सुरु होत असताना या शाळेने त्यातही पुढाकार घेतला आहे़ त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी शासनाच्या विविध विभागात शासकीय पदावर कार्यरत आहेत. या शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग असून स्वतंत्र वर्गखोल्या विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लघुशंकागृह, शालेय पोषण आहारासाठी उत्कृष्ट स्वयंपाकगृह आहेत. तसेच या शाळेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून बालपणापासून वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, या उद्देशाने तब्बल ३५० एकापेक्षा एक सरस पुस्तके या शाळेच्या वाचनालयात उपलब्ध आहेत.
सदरील शाळा ही संपूर्ण डिजिटल शाळा बनली असून पाल्यांना खाजगी शाळेत न घालता याच शाळेत घालण्यासाठी पालक उत्सुक असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण
माहूर तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात असलेले दहेगाव १०० टक्के आदिवासी गाव आहे़ पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थितीही १०० टक्के असते़ या ठिकाणच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबविले़
उपक्रमशील व कल्पकवृत्तीचे अध्यापनाचे व्रत अंगीकारलेली शिक्षक मंडळी लाभल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे़ दुर्गम व डोंगरी आदिवासी गावात सेवाभावी वृत्तीने कर्तव्य बजावतात़
- वाय़टी़ राजारुपे, मुख्याध्यापक