धर्माबादच्या वाहनात तेलंगणाचे इंधन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:35 AM2018-09-19T05:35:21+5:302018-09-19T05:36:05+5:30
पेट्रोल चार रुपयांनी स्वस्त असल्याने वाहनधारकांच्या सीमेपलीकडील पंपावर रांगा
नांदेड : राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल धर्माबाद आणि उमरी तालुक्यात मिळत असून धर्माबादपासून केवळ पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणात मात्र पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी आहेत़ त्यामुळे सीमावर्ती भागातील वाहने तेलंगणाच्या इंधनावरच चालत आहेत़
इतर राज्याच्या तुलनेत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर अधिक आहे. त्यातही नांदेड जिल्ह्याने इंधनाच्या दराबाबत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ धर्माबाद हा नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील तालुका आहे़ मंगळवारी धर्माबादेत पेट्रोलचा दर ९२़२९ पैसे, डिझेल ७९़८७, उमरीत पेट्रोल-९१़९९ तर डिझेल ७९़५९ रुपयांवर पोहोचले होते़ राज्यात धर्माबाद आणि उमरीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत़ त्यातच धर्माबादपासून अवघ्या पाच किमी अंतरावर तेलंगणात मात्र धर्माबादपेक्षा चार रुपये कमी दराने पेट्रोल मिळत आहे़ तेलंगणाच्या बासर तालुक्यातील पेट्रोल पंपावर मंगळवारी पेट्रोल ८८ रुपये ४८ पैसे लीटर होते़
दहा पैशांनी वाढले पेट्रोल
सोमवारी नांदेड शहरात पेट्रोल ९१ रुपये प्रति लीटर दराने विक्री केले जात होते़, तर डिझेल ७८़६५ पैसे होते़ मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये १० पैशांनी वाढ झाली़ शहरात पेट्रोल ९१़१० पैसे, तर डिझेल ७८़७५ पैसे प्रति लीटर होते़