टेलिफोन केबल वायर चोरी प्रकरणातील फरार आरोपी ६ वर्षानंतर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:53 PM2019-03-16T15:53:34+5:302019-03-16T15:55:35+5:30
आरोपी २०१३ पासून फरार होता
नवीन नांदेड : सहा वर्षापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत झालेल्या टेलिफोन केबल वायर चोरी प्रकरणातील एका फरार आरोपीला विशष गुन्हे शोध पथकाने अखेर गजाआड केले. ही घटना १६ मार्च रोजी वाजेगाव येथे घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड 'ग्रामीण' पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी सईद दादनसाब चौधरी व त्यांच्या अन्य साथीदारांनी २०१३ मध्ये टेलिफोनच्या केबल वायरचे बंडल चोरून नेले. त्याचवेळी, याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी सईद दादनसाब चौधरी याच्याविरूध्द वायर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, या चोरी प्रकरणातील आरोपी सईद चौधरी हा ग्रामीण पोलिसांच्या हाती तुरी देवून आजपर्यंत फरार होता.
दरम्यान, नांदेड ग्रामीण ठाण्यातील डीबी तथा विशेष गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना गत सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी १६ मार्च रोजी वाजेगावात आला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती समजताच ग्रामीण ठाण्यातील विशष गुन्हे शोध पथकातील नूतन पोउपनि. शेख जावेद, पो.हे.का. एकनाथ मोकले,नाईक पोका. प्रभाकर मलदोडे, प्रविण केंद्रे, पो.का. श्यामसुंदर नागरगोजे व पो. का. मारोती गुंडेकर आदींनी पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ मार्च रोजी वाजेगाव येथून फरार आरोपी सईद दादनसाब चौधरी यास अखेर जेरबंद केले आहे.