लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:42 PM2021-12-20T17:42:39+5:302021-12-20T17:45:51+5:30
लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला
हिमायतनगर : नांदेड जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला टेंभूर्णीकरांनी चांगला प्रतिसाद देत गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण केले. याशिवाय लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला. टेंभूर्णीकरांनी राबविलेला हा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी राबविणे आवश्यक आहे. असे झालेच तर जिल्हा १०० टक्के लसवंत होईल, यात शंका नाही.
ग्रामीण भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरपंच यशोदाबाई पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील व उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक अनिल कदम, लहाने, बांगर, आशा अणि अंगणवाडी ताई यांना ही माहिती दिली. सरपंच यशोदाबाई पाटील यांनी जातीने लक्ष घालून गावातील नागरिकांशी चर्चा सुरू केली. सोबत ग्रामसेवक अनिल कदम, शाळेचे मुख्याध्यापक लहाने, पावनमारी शाळेचे मुख्याध्यापक बांगर, पोलीस पाटील किसनराव जाधव, शिवाजी जाधव, अंगणवाडी, आशा वर्कर्स, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव पाटील या सर्वांच्या मदतीने घरोघरी जाऊन १८ वर्षांवरील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थलांतरित, कामासाठी बाहेर गेलेले ही सर्व माहिती उपलब्ध करून घेतली आणि गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले.
गावात आज १०० टक्के पहिला डोस अणि ७५ टक्के दुसरा डोस असे लसीकरण झाले. गावांत येणारे फेरीवाले, भाजीपाला विकणारे, नातेवाईक यांना केंद्रात लस देऊन प्रवेश दिला जातो. लस न घेण्याऱ्यांना टेंभूर्णी गावात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच या संदर्भातला सर्व आढावा घेऊन गावातील नागरिकांना नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबद्दल माहितीही देण्यात आली. आपला गाव परत तिसऱ्या लाटेकडे जाऊ नये यासाठी लस घेणे आवश्यक आहे असे समजावले.
१०० टक्के लसीकरण राबवण्यासाठी उपआरोग्य केंद्र विरसणी येथील सीएचओ भालेराव, एमपीडब्ल्यू तुकाराम पौरे , सिस्टर काळे, ग्रामसेवक आनंद कदम, बापूराव माने, प्रभाकर माने, सुरेश देवसरकर, स्वस्त धान्य दुकानदार सुरेश पाटील, उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, शिवाजी जाधव, किशनराव जाधव, विनायक माने, बाबुराव माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास देवसरकर, ग्रामपंचायत सेवक किशोर कांबळे, अंगणवाडी आशा वर्कर्स अणि गावातील सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित नागरिक अणि महिला मंडळी या सर्वांनी सहकार्य केले.