बिनविरोध ग्रामपंचायतीला दहा लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:35+5:302021-02-09T04:20:35+5:30
नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील, त्या ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त निधी दिला जाईल, ...
नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील, त्या ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त निधी दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली होती. त्यानुसार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून बोरगाव तेलंग ग्रामपंचायतीची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळत आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः बोरगाव तेलंगमध्ये जाऊन नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत दहा लाख रुपये निधीचे पत्र ग्रामस्थांना सुपूर्द केले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. बहुतांश ग्रामपंचायती बिनविरोध काढाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. अनेक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध काढणाऱ्या गावांना पाच ते दहा लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले होते. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजी कल्याणकर यांनीही या अनुषंगाने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या जातील अशा ग्रामपंचायतींना दहा लाख रुपयांचा निधी तत्काळ दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. आ. बालाजी कल्याणकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बोरगाव तेलंग येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. ही ग्रामपंचायत तिसऱ्यांदा जिंकणारे अनिल पाटील बोरगावकर यांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांनी विश्वास टाकत पुन्हा एकदा बोरगावकर यांच्या ताब्यात ग्रामपंचायत दिली.
बोरगाव ग्रामपंचायत बिनविरोध नवनिर्वाचित सदस्य अनिल शिवाजीराव पाटील क्षीरसागर, केशव शंकरराव क्षीरसागर, गिरजाबाई बालाजीराव क्षीरसागर, रतनबुवा पुरी, लक्ष्मीबाई पुरी, वच्छलाबाई निवडुंगे, राजू कंधारे यांच्यासह पोलीस पाटील अनंतराव क्षीरसागर, मारोतराव क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, गजानन क्षीरसागर, गोपाळ क्षीरसागर, रामचंद्र क्षीरसागर, उधवराव क्षीरसागर, शिवाजीराव क्षीरसागर, एकनाथराव क्षीरसागर, भारत क्षीरसागर, कोंडिबा निवडांगे, गंगाधर कंधारे, माधव कंधारे, नागोराव निवडांगे, आदींची उपस्थिती होती.