नांदेड जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:36 PM2018-05-18T18:36:20+5:302018-05-18T18:36:20+5:30

हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक आहे.

Ten thousand farmers in Nanded district have left the pigeon | नांदेड जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक

नांदेड जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक

Next

- श्रीनिवास भोसले 

नांदेड : हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ देवूनही आॅनलाईन नोंदणी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील १० हजार ६४३ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप शिल्लक असल्याने हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडूनच आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत नोंदणी केलेल्या १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ 

मराठवाड्यात यंदा तूरीचे विक्रमी उत्पादन झाले़ त्यात नांदेडचादेखील समावेश आहे़ जवळपास तूर उत्पादक शेतकऱ्यांना  प्रतिएकरी आठ ते बारा क्विंटलचा उतारा आला़ बाजारात हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत आहे़ कवडीमोल भावाने तूर विक्री करण्यापेक्षा शासनाच्या हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यास प्राधान्य दिले़ यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती़ 

जिल्ह्यात जवळपास २५ हजार ७४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली़ यातील १५ हजार १०४ शेतकऱ्यांकडून आजपर्यंत तूर खरेदी करण्यात आली़ तूर खरेदीमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील तूर खरेदी नेहमीच वादात राहिली़ कधी जागेचा प्रश्न तर कधी बारदाना उपलब्ध नसल्याने तूर खरेदी ब्रेक लागला होता़ दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५३ हजार ८२४ क्विंटल तूरीची शासनाकडून खरेदी करण्यात आली़ यामध्ये नांदेड तालुक्यातील हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १७ हजार ३८७ क्विंटल, नायगाव- १९ हजार ४५६ क्विंटल, लोहा- ११ हजार १२ क्विंटल, बिलोली- २३ हजार ५५७ क्विंटल, देगलूर- २८ हजार १०३ क्विंटल, मुखेड - १६ हजार ४२७ क्विंटल, किनवट - १४ हजार ८२० क्विंटल, भोकर - १२ हजार ११२ क्विंटल, हदगाव - १० हजार ९४७ क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे़ परंतु, आजही हजारो शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे़ शासनाने अंतिम मुदत दिल्याने  १५ मे पासून खरेदी केंद्र बंद केली आहेत़ नोंदणी करूनदेखील शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केले़ त्यामुळे सोयाबीन, मुग आणि उडीद यासह तूर पिकावरच शेतकऱ्यांची मदार आहे.  

शासनाकडून ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा  एकूण ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे़ तसेच हेक्टरी बारा क्विंटलचा उतारा गृहीत धरून खरेदी  करण्यात येत होती़ त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये समाधान होते़ परंतु, १५ मेपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे झाले़ तर उर्वरित १० हजाराहून अधिक शेतकरी अद्याप शिल्लक आहेत़ त्यांच्याकडे असलेली तूर शासन घेणार की त्यांना ती कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे़ 

शेतकरी संभ्रमावस्थेत
बाजारात सध्या तूरीला ३७०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे़ शासनाकडून जवळपास साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला़ परंतु, खरेदी बंद झाल्याने  शेतकरी तूर कुठे विक्री करावी या संभ्रामावस्थेत सापडला आहे़ नोंदणी करूनदेखील तूर विक्री न झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़ शासनाने नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, मुदत संपल्याने नाफेडने हात वर केल्याने शासन तूर खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़.

Web Title: Ten thousand farmers in Nanded district have left the pigeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.