अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:38 AM2019-06-20T00:38:18+5:302019-06-20T00:38:57+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.
नांदेड : तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार किरण अंबेकरसह नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, तलाठी राहूल चव्हाण आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. नांदेड तहसिल कार्यालयाने वाळू चोरी संदर्भात वेळोवेळी कारवाई करत मराठवाड्यात पहिल्यांदाच जिलेटीन कांड्याच्या स्फोटाने वाळू उपसा करणारा सक्क्षण पंप उध्वस्त केला होता. त्यानंतर कारवाया सुरूच होत्या. १९ जूनच्या रात्रीही तहसीलदार अंबेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी गस्त घातली. या गस्ती दरम्यान गंगाबेट येथे पहाटे अडीच वाजता १० हायवा वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. दोन ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू होते. या कारवाईत एम.एच.२६, बीई २३०७, एम.एच.२६, बीई २८५०, एम.एच.२६, बीई ७२२८, एम.एच.२६, बी.ई. ४३०७, एम.एच.०४/ जीएफ ७८७८, एम.एच. ४५-११३७, एम.एच.२६-बीई १७०९, एम.एच.२४/एबी ८१८७, एम.एच.२९/ डीसी २२० (एम.एच.२६/६६५५) आणि अन्य एक क्रमांक नसलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेली ही सर्व वाहने नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मंडळ अधिकारी के.एम. नागरवाड, तलाठी एच.जी. पठाण यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी नांदेड तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या प्रत्येक वाहनाला २ लाख १० हजार ४०० रुपये दंड आकारला आहे. या कारवाईत २१ लाख ४ हजार रुपये एकूण दंड आकारण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, के.एम. नागरवाड, तलाठी उमाकांत भांगे, मंगेश वांगीकर, ईश्वर मंडगीलवार, कैलास सूर्यवंशी, सचिन नरवाडे, राहूल चव्हाण आदींनी केली.