गुरुद्वारा परिसरात तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:08+5:302021-03-31T04:18:08+5:30
दरवर्षी धुळवडीच्या दिवशी हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. आयोजकांकडूनही तसा शब्द देण्यात ...
दरवर्षी धुळवडीच्या दिवशी हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. आयोजकांकडूनही तसा शब्द देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात आरती झाल्यानंतर काही उत्साही तरुणांनी हल्ला बोलची मिरवणूक मुख्य रस्त्यावर आणली. यावेळी हातात तलवार आणि भाले घेऊन असलेले तरुण धावत होते. त्यामुळे पोलिसांनाही पळ काढावा लागला. यावेळी काही जणांनी पोलिसांनाच लक्ष्य केले. यामध्ये पोलीस अधीक्षकांचा अंगरक्षक दिनेश पांडे, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, अजय यादव, सचिन सोनटक्के, गोविंद जाधव यासह आठ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक यांसह पोलिसांच्या आठ वाहनांचा चक्काचूर केला. रस्त्यावरील सर्व बॅरिकेट्सही तोडण्यात आले होते. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती होती. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात ३०० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. सकाळपर्यंत ६० जणांची सीसी टिव्ही कॅमेऱ्याच्या आधारे ओळख पटवून १८ जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर गुरुद्वारा परिसरात शुकशुकाट होता. पोलिसांनी बॅरिकेटींग करून बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांवर या हल्ल्याच्या घटनेचा समाज माध्यमातून निषेध करण्यात येत आहे.