नांदेड मनपातील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:27 AM2018-08-12T00:27:16+5:302018-08-12T00:28:02+5:30
महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़
नांदेड वाघाळा महापालिकेतील वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देवून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आयुक्त लहुराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली ४ आॅगस्ट रोजी निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीस उपायुक्त गिता ठाकरे, विलास भोसीकर, संतोष कंदेवार, मुख्य लेखाधिकारी माधव बाशेट्टी, विधि अधिकारी अजितपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांची उपस्थिती होती़ या समिती सदस्यांनी दिलेल्या निर्णयानुसार १२ वर्षे नियमित सेवा झालेल्या ९३, २४ वर्षे नियमित सेवा झालेल्या कार्यरत, सेवानिवृत्त ५२ अशा एकूण १४५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानंतर १० आॅगस्ट रोजी आयुक्त लहुराज माळी यांनी १४५ कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे़
दरम्यान, तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडविला होता़ तर सध्याचे आयुक्त माळी यांनी कालबद्ध पदोन्नतीचा विषय सोडविला आहे़
---
दोन दिवसांत महागाई भत्त्याची रक्कम
दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांची थकीत असलेली ८ महिन्यांची महागाई भत्याची रक्कम जमा करण्याबाबत मुख्य लेखाधिकारी यांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत़ ही महागाई भत्त्याची रक्कम येत्या दोन दिवसांत कर्मचाºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़