दहशतवादी रिंदाचा जिवलग मित्र मॅक्सला ठोकल्या बेड्या
By शिवराज बिचेवार | Published: July 6, 2023 07:28 PM2023-07-06T19:28:40+5:302023-07-06T19:32:35+5:30
खंडणीच्या अनेक प्रकरणात रिंदाकडून केली मध्यस्थी
नांदेड -दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा जिवलग मित्र आणि राईट हँड समजल्या जाणाऱ्या भरत पोपटाणी उर्फ मॅक्सला विशेष तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. खंडणीसाठी रिंदाने व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर भरत पोपटाणी हाच मध्यस्थी करून खंडणीची रक्कम रिंदाकडे पाठवित होता. सातत्याने तो रिंदाच्या संपर्कातही होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावर होत्या. त्यातच विशेष तपास पथकाने त्याला शिताफीने अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याने खंडणीसाठी मागील वर्षी ५ एप्रिलला बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या केली होती. त्यापूर्वीही रिंदाने जिवे मारण्याची धमकी देवून व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली होती. बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती. या पथकाने बियाणी हत्येतील १६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दोन शार्पशुटर हे एनआयएच्या ताब्यात आहेत. परंतु त्यानंतरही रिंदाच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार सुरूच होते. त्यातच काही दिवसापूर्वी पोलिसांनी सापळा रचून रिंदाच्या नावे खंडणी मागणाऱ्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता रिंदाचा जिवलग मित्र असलेल्या भरत पोपटाणी उर्फ मॅक्सला नांदेडातून पकडण्यात आले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे रिंदाने नांदेडात किती जणांकडून आणि किती रकमेची खंडणी वसूल केली यासह अनेक खुलासे होणार आहेत.
खंडणी देणाऱ्यांचाही शोध सुरू
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रिंदाच्या नावे खंडणी मागणे आणि देणे हे दहशतवादाला समर्थन असल्याचे स्पष्ट केले होेते. त्यामुळे खंडणी देणारेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मॅक्सने एका व्यापाऱ्याकडून ४० लाख रुपयांची खंडणी रिंदाच्या नावे वसूल केली होती. त्यानंतर ही रक्कम मॅक्सने रिंदाकडे कोणत्या मार्गाने पाठविली? मॅक्सला स्वतला त्यातील किती रक्कम मिळाली? यासह रिंदाचे नांदेडातील इतर साथीदार कोण यासह अनेक बाबी पोलिस तपासात उघड होणार आहेत.