अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे ते लग्न झालेच नाही
By प्रसाद आर्वीकर | Published: April 24, 2023 07:52 PM2023-04-24T19:52:29+5:302023-04-24T19:52:46+5:30
चाइल्डलाइन पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.
नांदेड : अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे एक बालविवाह होणार होता. त्याची कुणकुण नांदेडच्या चाइल्डलाइन पथकाला मिळाली. पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे.
राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू आहे. १८ वर्षांपूर्वी मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी ग्रामीण भागात सर्रास बालविवाह लावले जात आहेत. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दि. २२ एप्रिल रोजी अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे बालविवाह होणार असल्याची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून चाइल्डलाइनला मिळाली. या माहितीच्या आधारे चाइल्डलाइनच्या अर्चना केसकर आणि दीपाली हिंगोले यांनी बीट जमादार बालाजी तोरणे, आगलावे यांच्यासह बारसगाव गाठले. मुलीच्या घरी जाऊन बालविवाह कायद्याची माहिती दिली.
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मुलीचे लग्न करू शकता, असे पालकांना सांगितले. यावेळी पोलिसपाटील सुनील मोरे, ग्रामपंचायत सदस्य गोदावरी बारसे, अंगणवाडी ताई गंगाबाई, रंजना काळे, ग्रामसेवक गणेश आडे यांच्याशी संपर्क साधून हा विवाह रोखण्यात आला. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचे लग्न करणार असे हमीपत्र घेण्यात आले. त्यामुळे एक बालविवाह रोखला गेला आहे.