आरोपीने पोलिसांवर रोखली बंदूक; निरीक्षकाने प्रसंगावधान राखत चालविली गोळी, केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:36 AM2022-05-05T11:36:37+5:302022-05-05T11:37:47+5:30
चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन त्यांच्यावरच रोखली
नांदेड: नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील कैलास बिगणिया टोळीतील अट्टल दिलीप डाखोरे याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावरच आरोपीने बंदूक रोखली. प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांनी डाखोरे च्या मांडीवर गोळी मारून त्याला जेरबंद केले.
30 एप्रिल रोजी तुप्पा भागात किरकोळ कारणावरून आरोपी दिलीप डाखोरे याने सतीश कसबे याच्यासोबत वाद घालून गोळी झाडली होती. सुदैवाने डाखोरेचा नेम चुकला. त्यानंतर डाखोरेने कसबेवर तलवारीने हल्ला केला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. 4 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी द्वारकादास चिखलीकर यांना डाखोरे हा लोहा ते पालम रस्त्यावर सुनेगाव येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे हे त्याची चौकशी करीत असताना डाखोरे याने सोनवणे यांच्या कमरेला लावलेली पिस्टल हिसकावून पोलिसांवर रोखली. पोनी चिखलीकर यांनी डाखोरेला शरण येण्यास सांगितले. परंतु डाखोरे हा पोलिसांवर बंदूक रोखत जीवे मारण्याची धमकी देत होता. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच चिखलीकर यांनी प्रसंगावधान राखत डाखोरेच्या मांडीवर गोळी चालविली. त्यामुळे डाखोरे कोसळला. पोलिसांनी लगेच त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याच्या जवळील बंदूक ही जप्त केली. चिखलीकर यांच्या तत्परतेने इतर सहकारी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत, गेल्या काही दिवसात 26 बंदुकी आणि शेकडो तलवारी जप्त केल्या आहेत.