नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या मजुराचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 07:48 PM2023-07-28T19:48:40+5:302023-07-28T19:49:04+5:30
वसरणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या शेजारील नाल्याला अतिवृष्टीने पूर आला होता
नांदेड: नांदेड ते लातूर मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाट्याहून वसरणीकडे जाणाऱ्या नाल्यामधील पाण्यात गुरुवारी रात्री एक ३६ वर्षीय मजूर वाहून गेला होता. आज सकाळी मजुराचा मृतदेह आढळून आला. विठ्ठल रामचंद्र कापावार असे मृत मजुराचे नाव आहे.
नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील एनडी-३१, 'हडको' परिसरातील रहिवासी तथा मजूरीचे काम करून आपली उपजीविका भागविणारे विठ्ठल रामचंद्र कापावार हे २७ जुलै रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेचेदरम्यान, डॉ. आंबेडकर चौक (लातूर फाटा) परिसरातून घराकडे जात होते. दरम्यान, वसरणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या शेजारील नाल्याला अतिवृष्टीने आलेल्या पुराच्या पाण्यात विठ्ठल काचावार वाहून गेले.
ही बाब लक्षात येताच नांदेड ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. आज सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, सपोउपनि. शेषराव शिंदे तसेच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोद्दीन आदी कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. काही वेळाने नाल्यात विठ्ठल रामचंद्र कापावार यांचा मृतदेह सापडला. अतिवृष्टीने नाल्याला आलेल्या पुराचे पाण्यात वाहून जावून विठ्ठल कापावार यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल नांदेडच्या 'सिडको व हडको' परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.