चिमुकल्यांनी ५ तास उपाशीपोटी बसून मिळवले शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 05:55 AM2023-06-16T05:55:23+5:302023-06-16T05:55:39+5:30
'आम्हाला शिक्षक हवेत' मागणीसाठी नांदेड जि. प. दालनासमोर मुलांनी भरवली शाळा
सचिन मोहिते, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षकांची पदे भरावीत यासह गणित, इंग्रजी विषयांना शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी मरखेल येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनासमोर ठिय्या मारला. विद्यार्थी चार तास उपाशीपोटी बसले आणि शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतले.
शिक्षकांच्या मागणीचा प्रश्न मागील वर्षीपासून रखडला होता. प्रशासनाला सात वेळा पत्र पाठवून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी ४० विद्यार्थ्यांनी थेट नांदेड गाठले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.
आम्हाला शिक्षक हवेत, या मागणीसाठी गुरुवारी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर मुलांनी शाळा भरवली होती.
अन् नियुक्ती आदेश घेऊनच परतले ‘आंदोलक’
मरखेल जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करावीत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शिक्षकांचे नियुक्ती आदेश मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी केला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी इंग्रजी, गणित आणि दोन पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.